Join us  

लाल भोपळ्याचे घारगे करण्याची पारंपरिक रेसिपी- अगदी आजी करायची तसा नवरात्र स्पेशल पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2024 5:22 PM

Bhopla Gharge pumpkin puri easy recipe for navratri : पारंपरिक पद्धतीने केले जाणारे हे घारगे आरोग्यासाठीही अतिशय चांगले असतात.

भोपाळ घारगे हा कोकणातला खास पारंपरिक पदार्थ. चवीला खुसखुशीत आणि खायलाही सोपा असलेला हा पदार्थ परफेक्ट जमतोच असे नाही. कधी हे घारगे खूप कडक होतात तर कधी तेलात घातले की फुटतात. असं होऊ नये यासाठी घारगे करण्याचे प्रमाण आणि पद्धत माहिती असायला हवी. नवरात्रीत ललिता पंचमी, अष्टमी किंवा एरवीही हे घारगे केले जातात. पारंपरिक पद्धतीने केले जाणारे हे घारगे आरोग्यासाठीही अतिशय चांगले असतात (Bhopla Gharge pumpkin puri easy recipe for navratri). 

भोपळ्यामध्ये व्हिटामिन ए, इ, सी सोबतच आयर्नचा मुबलक साठा असतो. त्यामुळे लाल भोपळा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच यातील अॅंटीऑक्सिडंट्समुळे आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होते. लाल भोपळ्यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन एमुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. भोपळ्यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबरचं प्रमाण जास्त असल्याने शरीरातील फॅट्स कमी होण्यासाठीही त्याचा चांगला उपयोग होतो. गोड चवीचे आणि कोणत्याही वेळेला खायला उपयुक्त असे हे घारगे कसे करायचे पाहूया.. 

१. भोपळा स्वच्छ धुवून बारीक फोडी चिरुन घ्याव्यात. 

(Image : Google)

२. पातेल्यात थोडे पाणी घेऊन त्यात या फोडी शिजवाव्यात.

३. बोटाने फोड दाबल्यावर शिजल्यासारखी वाटली तर गॅस बंद करायचा आणि खाली पाणी उरले असे ल तर ते एका वाटीत काढून ठेवायचे. 

४. या फोडींमध्येच अंदाजे गूळ घालायचा आणि हलवून चांगले एकजीव करुन घ्यायचे. 

५. गूळ यामध्ये चांगला एकजीव झाला की हे मिश्रण रवीने किंवा डावाने एकसारखे करायचे. तसे ओबडधोबड आवडत नसल्यास मिक्सरमध्ये बारीक केले तरी चालते. 

६. यामध्ये तुपाचे मोहन, वेलची पूड घालून अंदाज घेत गव्हाचे पीठ घालायचे.

७. घारगे खुसखुशीत होण्यासाठी त्यातच थोडा रवा घालायचा. 

(Image : Google)

८. हे पीठ मळताना तेल, पाणी या कशाचाच वापर न करता चांगले घट्ट पीठ मळून घ्यायचे.

९. पीठ मळून झाल्यावर १५ मिनीटे ते बाजूला ठेवायचे. 

१०. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून ते मध्यम आचेवर गरम होऊ द्यायचे.

११.  साधारण १५ मिनीटांनी तेल न लावता थोडे जाडसर घारगे लाटून त्या तेलात मध्यम आचेवर लालसर तळून घ्यायच्या. 

१२. गार झाल्यावर हे घारगे तूप घालून किंवा नुसतेही खायला खूप मस्त लागतात. 

टॅग्स :अन्नपाककृतीनवरात्री