संध्याकाळच्या वेळी किंवा एरवीही आपण स्वयंपाकाचा कंटाळा आला की मस्त मूगाच्या डाळीची खिचडी करतो. पचायला हलकी आणि पोटभरीची अशी ही खिचडी चविलाही अतिशय छान लागते. कधी लसूण आणि खोबरं घालून तर कधी वरुन लाल मिरची आणि लसणाची फोडणी देऊन आपण ही खिचडी करतो. लहान मुलांसाठी भाज्या घालून आणि थोडी पातळसर करतो. मात्र ही एकाच प्रकारची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर साऊथ इंडीयन स्टाईलचा बिशी बेळे भात हा प्रकार नक्की ट्राय करायला हवा. पारंपरिक आणि करायली सोपी ही रेसिपी चविलाही तितकीच सुंदर लागते. पाहूयात यासाठी नेमके कोणकोणते जिन्नस लागतात आणि हा भात झटपट कसा करायचा (Bishi Beli Rice Authentic South Indian Recipe).
साहित्य -
मूग डाळ - २ चमचे
तूर डाळ - १/३ कप
तांदूळ - १/२ कप + २ चमचे
तूप - १ चमचा
भाज्या - २ कप अंदाजे (गाजर, बीन्स, वांगी, शेवगा, शिमला मिरची इ.)
हिरवी मिरची - १ किंवा २
कोथिंबीर - २ चमचे
काळे मिरे - 7-8
टोमॅटो - २ मोठे
हळद - अर्धा चमचा
सांबार मसाला - १ चमचा
मीठ - चवीनुसार
चिंच - लहान लिंबाच्या आकाराइतकी
गूळ - १ चमचा
तडका साठी
तूप - २ चमचे
मोहरी - अर्धा चमचा
हिंग - चिमूटभर
सुकी लाल मिरची - २
कढीपत्ता - ७ ते ८ पाने
तिखट - अर्धा चमचा
काजू - १०-१२
कांदा - १ ते २
कृती -
१. दोन्ही डाळी आणि तांदूळ ३० मिनीटांसाठी पाण्यात भिजवून ठेवा.
२. चिंच कोमट पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याच्या बिया काढून टाका.
३. प्रेशर कुकरमध्ये सगळ्या भाज्या, डाळ, तांदूळ घाला.
४. यामध्ये मीठ, हळद, सांबार मसाला, तिखट तूप आणि ३ कप पाणी घालून कुकरला ३ शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्या.
५. कुकर उघडल्यानंतर त्यामध्ये चिंचेचे पाणी घाला, साधे पाणी, गूळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
६. छोट्या कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये मोहरी, हिंग, कडीपत्ता, लाल मिरची, काजू, लहान कांदे घालून चांगले परतून घ्या आणि शिजलेल्या भातावर ही फोडणी द्या.
७. गरमागरम पौष्टीक अशा चविष्ट बिशी बेळी भाताचा आनंद घ्या.