कारलं म्हटलं की सगळ्याचंच तोंड वाकडं होतं. पण कारलं खाणारे लोक मात्र आवडीनं त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीनं रेसिपीज बनवून त्याचं सेवन करतात. उदा. भरलेली कारली, कुरकुरीत कारल्याची भाजी. त्यातल्यात त्यात भरलेल्या कारल्यांमध्ये तुम्हाला शेंगदाण्याचे कुट किंवा खोबरं- लसणाचं मिश्रण असे ऑप्शन्स असतात. पण न खाणारे मात्र त्यात कितीही व्हेरिएशन करा. कारलं खायला खायला काही तयार होत नाही.
अशावेळी वेगळं काय बनवायचं असा प्रश्न घराघरातील महिलांना पडतो. कारल्याच्या कडवटपणामुळे अनेकजण ताटात घेणं टाळातात. कडवटपणा कमी करण्याची ट्रिक काहीजणांनाच माहीत असते. बाकीचे लोक जसं आहे तर कारलं घेऊन भाज्या बनवतात. तुमच्याही बाबतीत असं होत असेल तर आज आम्ही तुम्हाला कारल्याचा कडवटपणा निघून जाण्याासाठी काय करता येईल याबबत टिप्स सांगणार आहोत.
१) कारल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी सगळ्यात आधी कारल्याची वरवर सालं काढून घ्या. त्यानंतर कारल्याला मीठ लावून जवळपास तासभर ठेवून द्या. त्यानंतर तुम्ही याची भाजी करू शकता. मीठामुळे कारल्याची कडून चव कमी होते आणि अधिक रुचकर लागतात.
२) कारल्याला मधोमध कापून तांदळाच्या पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवा. त्यानंतर भाजी बनवायला सुरूवात करा. असा प्रयोग केल्यानंतर कारल्याचा कडवटपणा कधी निघून जाईल कळणारही नाही.
३) कारल्याची भाजी बनवण्याआधी मिठाच्या पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवा.
४) भरलेली कारली बनवत असताना त्यात भाजलेल्या दाण्याचे कुट आणि भाजलेल्या सुक्या नारळाचा किस आणि चवीपुरतं लसूणही, हवी असल्यास आमसूल पावडर घाला. या पदार्थांच्या असण्यानं कारल्याची कडू चव दूर होऊन पदार्थ चविष्ट लागतो.
अशी बनवा कारल्याची भाजी
१) कारले पाच ते सहा (हिरव्यागार रंगाची आणि मध्यम आकाराची कारली निवडावीत, ती कमी कडू असतात)
२) चिंचेचा कोळ पाव वाटी
३) गुळ पाव वाटी
४) चिरलेला कांदा एक वाटी
५) लसूण पाच ते सहा पाकळ्या
६) लाल तिखट
७) गोडा मसाला
८) हळद
९) मीठ
१०) कोथिंबीर
११) तेल
कृती
कारल्याच्या आतील बिया काढून गोल चकत्या करून घ्या. एका भांड्यात या चकत्या घेऊन त्यांना चमचाभर मीठ चोळून घ्या. आता मीठामुळे सुटलेले पाणी काढून टाका. उकळत्या पाण्यात या चकत्या सात ते आठ मिनिटे शिजवून पाणी काढून टाका. दुसऱ्या कढईत तेल तापवून त्यात मोहरी ताड्ताडवून घ्या. मग त्यात ठेचलेल्या लसूण पाकळ्या आणि कांदा गुलाबीसर परतवून घ्या. कांद्याचा रंग बदलल्यावर त्यात तिखट,गोडा मसाला आणि कारल्याच्या चकत्या टाकून एकजीव करा. त्यात चिंचेचा कोळ, गुळ घालून एकजीव करा. त्यात वाटीभर पाणी घालून शिजवा आणि थोडा रस्सा शिल्लक असताना गॅस बंद करा. कोथिंबीर घालून गरमागरम भाजी सर्व्ह करा.