'कडू कारल तुपात तळले, साखरेत घोळवले तरी कडू ते कडूच राहणार' अशी कारल्या बद्दलची म्हण आपल्याकडे फार लोकप्रिय आहे. कारले म्हटलं की, आपल्याकडे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच नाक मुरडतात. कारल्याची भाजी ताटात दिसताच सगळ्यांच्या कपाळावर आट्या पडतात. कारले चवीला कडू असल्याने बऱ्याच जणांना ते आवडत नाही. कारले चवीला जरी कडू असलं तरी आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर असत. कारल्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट, फ्लेव्होनॉईड्स आणि इतर पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या अनेक आरोग्य समस्या सहज दूर होतात. ज्यांना फिट राहायचं आहे त्यांच्यासाठी तर कारल्याशिवाय कोणताही डाएट प्लॅन अपूर्णच ठरेल. वजन कमी करायचं असो किंवा मधूमेह नियंत्रित ठेवायचा असो कारले खाणं तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. आपण कारल्याचा रस, कारल्याची भाजी तर खातोच पण जर तेच तेच खाऊन कंटाळा आला तर आपण झटपट होणारे कारल्याचे काप करू शकतो. किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यात झटपट कारल्याचे काप कसे तयार करायचे ते समजून घेऊयात(Bitter Gourd Recipe : Karlyache Kaap).
कारल्याचे काप कसे तयार करायचे याची कृती me_haay_foodie या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आली आहे.
साहित्य -
१. कारले - पाव किलो २. हळद - चिमूटभर ३. मीठ - चवीनुसार ४. गरम मसाला - १ टेबलस्पून ५. धणे पावडर - १ टेबलस्पून ६. जिरे पावडर - १ टेबलस्पून ७. लाल तिखट - १ टेबलस्पून ८. लिंबाचा रस - १ टेबलस्पून ९. बेसन - १ टेबलस्पून १०. मक्याचे पीठ - १ टेबलस्पून
कृती -
१. कारले स्वच्छ धुवून घ्या. २. कारले कापून त्यातील गर वेगळा काढून घ्या. ३. कारल्याच्या गोल चकत्या कापून घ्या. ४. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात एक टेबलस्पून मीठ घालून त्या पाण्यात या चकत्या १० मिनिटे बुडवून ठेवा. यामुळे कारल्याचा कडवटपणा कमी होण्यास मदत होईल. ५. त्यानंतर हे मिठाचे पाणी काढून चकत्या एका भांड्यात काढून घ्या. त्यात हळद, मीठ, गरम मसाला, धणे पावडर, जिरे पावडर, लाल तिखट, लिंबाचा रस बेसन, मक्याचे पीठ घालून या मिश्रणाने कारल्याच्या चकत्या कोट करून घ्या. ६. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात या चकत्या सोडून शॅलो फ्राय करून घ्या. ७. या चकत्या दोन्ही बाजूने चांगल्या खरपूस तळून घ्या.
कारल्याचे काप खाण्यासाठी तयार आहेत.