Join us  

बाजारात भरपूर द्राक्षं आहेत, घरच्याघरी बनवा ब्लॅक करंट आइस्क्रिम, वापरा फक्त ४ गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2023 2:24 PM

Black Currant Ice Cream Recipe With Homemade Black Grapes Crush : फक्त ४ गोष्टी वापरुन घरच्याघरी ब्लॅक करंट आइस्क्रिम बनवा आणि मनसोक्त खा...

उन्हाळा आणि आईस्क्रीम हे जणू काही समीकरणच तयार झाले आहे. उन्हाळ्यात आपल्याला बऱ्याचवेळा काहीतरी गारेगार, थंड खाण्याची इच्छा होतेच. अशावेळी आपण थंड शीतपेये, आईस्क्रीम, शहाळाचे पाणी नक्कीच पितो. उन्हाळ्यातच नव्हे तर आपण वर्षाचे बाराही महिने कधीही आईस्क्रीम खाण्यासाठी तयार असतोच. जेवल्यानंतर काहीतरी गोड म्हणून आईस्क्रीम खाण्याचा मोह आपण बऱ्याचदा टाळू शकत नाही. घरांतील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आईस्क्रीम हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. 

आईस्क्रीम पार्लरमध्ये गेल्यानंतर त्या बंद काचेच्या पेटीतील गारेगार, रंगीबेरंगी आईस्क्रीम खाणे म्हणजे सुख. बाहेर गेल्यानंतर आपण आईस्क्रीम खातोच पण काहीवेळा आपण घरी देखील आईस्क्रीम बनवतो. उन्हाळ्यांत येणाऱ्या वेगवेगळ्या फळांचे पल्प वापरुन आपण घरच्या घरी आईस्क्रीम तयार करतो. बहुतेक वेळा आईस्क्रीमचे सगळेच फ्लेवर आपले आवडते असतात. परंतु ब्लॅक करंट हा त्यातल्यात्यात सगळ्यांच्याच आवडीचा आईस्क्रीम फ्लेवर आहे. यंदाच्या उन्हाळ्यात केवळ ४ मुख्य घटक पदार्थ वापरुन आपण विकतसारखे ब्लॅक करंट आईस्क्रीम घरीच बनवू शकतो(Black Currant Ice Cream Recipe With Homemade Black Grapes Crush).         

साहित्य :- 

१. काळी द्राक्ष - २५० ग्रॅम २. व्हिपिंग फ्रेश क्रिम - २ कप ३. साखर - १ कप ४. काळे मनुके - ३ टेबलस्पून 

कृती :- 

१. काळी द्राक्ष सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यावीत. २. आता ही द्राक्ष मिक्सरमध्ये पातळ पेस्ट होईपर्यंत फिरवून घ्यावीत. ३. एक पॅन घेऊन त्यात द्राक्षांची पातळ पेस्ट व एक कप साखर घालून ते मंद आचेवर १५ ते २० मिनिटे शिजवून, या काळ्या द्राक्षांची थोडी चिकटसर जेली तयार करुन घ्यावी. ४. एका मोठ्या बाऊलमध्ये व्हिपिंग फ्रेश क्रिम घेऊन ती व्यवस्थित ब्लेंडरच्या मदतीने व्हिस्क करुन घ्यावी. फ्रेश क्रिम व्हिस्क करुन फुलून आली की त्यात द्राक्षांची जेली घालून सगळे मिश्रण नीट एकजीव करुन घ्यावे. 

५. त्यानंतर या मिश्रणांत ३ टेबलस्पून काळे मनुके घालावेत. ६. आता हे मिश्रण एका आईस्क्रीम मोल्डमध्ये घालून त्यावर थोडीशी द्राक्षांची जेली घालून चमच्याच्या मदतीने ढवळून घ्यावे. ७. त्यानंतर पुढील ८ ते १० तासांसाठी ब्लॅक करंट आईस्क्रीम रेफ्रिजरेट करण्यासाठी डिप फ्रिजरमध्ये ठेवावे.   

आईस्क्रीम पार्लरसारखे, ब्लॅक करंट आईस्क्रीम घरच्या घरी खाण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :अन्नपाककृती