Onion Buying Tips : उन्हाळा सुरू झाला की, जास्तीत जास्त लोक भरपूर कांदे खरेदी करून घरात स्टोर करतात. कारण या दिवसात लोक जेवणासोबत कच्चा कांदा अधिक खातात. यामुळे त्यांचा उष्माघातापासून बचाव होतो आणि शरीर आतून थंड राहतं. कांद्याचा वापर रोज वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. कांद्यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. त्वचा किंवा केसांची समस्या दूर करण्यासाठी सुद्धा अनेकजण कांद्याचा वापर करतात. मात्र, उन्हाळ्यात तुम्हीही भरपूर कांदे खरेदी करून ठेवत असाल तर सावध व्हा. जर कांदे खरेदी करताना काळजी घेतली नाही तर नुकसानही होऊ शकतं. अशात कांदे खरेदी करताना काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊ.
काय काळजी घ्याल?
- जेव्हाही तुम्ही कांदे खरेदी कराल तेव्हा त्यावर काळे डाग असू नये. कांद्यावर दिसणारे हे काळे डाग एस्परगिलस नायजर नावाचं ब्लॅक फंगस असतं, जे मातीच्या आत आढळतं. कांदे जमिनीच्या आत उगवतात त्यामुळे यांचा प्रभाव कांद्यावर जास्त येतो.
- कांद्याच्या सालीवर दिसणारे काळे डाग पाण्यानं स्वच्छ होतात. त्यानंतर कांदा खाऊ शकता. पण जर तुम्हाला त्वचेसंबंधी काही अॅलर्जी असेल तर तुम्ही काळे डाग असलेला कांदा अजिबात खाऊ नये. कारण यानं त्वचेवर रेडनेस आणि खाज येऊ शकते. या कांद्यानं तुम्हाला अस्थमा रूग्णांसाठी नुकसानकारक असू शकतो.
वासावरून ओळखा
कांदा खरेदी करताना त्याचा गंध घेणं फार महत्वाचं असतं. जर कांदा सडलेला असेल तर त्यातून खराब वास येईल. खासकरून उन्हाळ्यात गरमीमुळे कांदे व्यवस्थित स्टोर न केल्यानं कांदे आतून सडतात.
कांद्यातील पोषक तत्व
- कांद्यामध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे पचनक्रिया आणखी मजबूत होते.
- कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर प्रमाणात असतं. जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं.
- कांद्यामध्ये पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतं. जे ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करतं.
- कांद्यामध्ये मॅग्नेशिअमचं प्रमाणही अधिक असतं. जे स्नायू मजबूत करण्यास मदत करतं.
उन्हाळ्यात कांदा नियमितपणे खाल्ला तर याने शरीराला अनेक फायदे मिळतात. याने तुमचा उन्हापासून बचाव होतो. कारण कांदा थंड असतो. याने शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.