Join us  

मशरूमवर काळे डाग? मशरूम धुण्याच्या ५ टिप्स, फ्रिजमध्ये टिकतील जास्त दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2022 11:49 AM

The Fast & Easy Way to Clean Mushrooms : मशरुम्स वरील काळा थर कसा काढावा हा प्रश्न पडत असेल तर यासाठी काही खास टीप्स समजून घेऊयात.

थंडीच्या सिजनमध्ये बाजारात सगळ्याच प्रकारच्या भाज्या व फळे खूप चांगली मिळतात. आपण बाजारात खरेदी करत असताना एका प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये पॅक केलेले छत्रीच्या आकाराचे मशरूम हल्ली जास्त पाहायला मिळतात. या मशरूम्सना सध्या बाजारात खूप मोठी मागणी आहे. हेल्थ कॉन्शियस व्यक्ती आपल्या डाएट मध्ये या मशरुम्सचा आवर्जून वापर करतात. मशरूम ही ठराविक सिजनमध्ये येणारी भाजी असल्यामुळे आपण हौसेने ती खरेदी तर करतो. परंतु कधी कधी  हे मशरूम्स फ्रिजमध्ये ठेवून त्यावर एक काळ्या रंगाचा थर जमा होतो. तसेच आपल्यापैकी काही गृहिणी ही भाजी पहिल्यांदा करत असतील तर हे मशरुम्स कोणत्या पद्धतीने स्वच्छ करावेत, याची माहिती नसते. जर तुम्हालासुद्धा या मशरुम्स वरील काळा थर कसा काढावा हा प्रश्न पडत असेल तर यासाठी काही खास टीप्स समजून घेऊयात.(The Fast & Easy Way to Clean Mushrooms).  

काय काय करता येऊ शकते ?

१. हळद आणि मीठाचा वापर - एका बाऊलमध्ये चिमूटभर हळद आणि मीठ घालून त्या मिश्रणात हे मशरुम्स काही काळासाठी ठेवून द्या. थोड्यावेळाने, या मशरुम्सना स्वच्छ पाण्याच्या मदतीने धुवून घ्या. 

२. मैदा - जर तुमचे मशरुम्स काळे पडले असतील तर त्यावर थोडा मैदा भुरभुरून घ्या. तसेच बोटांच्या मदतीने या मशरुम्सना हलकेच स्क्रब करून घ्या मग स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. अश्याप्रकारे मैद्याच्या साहाय्याने तुम्ही मशरुम्सवरील काळा थर काढू शकता. 

३. सुरीचा वापर - धारदार सूरी किंवा चाकूच्या मदतीने तुम्ही मशरुम्सवरील काळा थर सहज काढू शकता. हा थर काढून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने मशरुम्स धुवून घ्या. 

४. रवा - रव्याच्या मदतीने तुम्ही मशरुम्स स्वच्छ करू शकता. एक चमचा रवा घेऊन त्यात मशरुम्स घोळवून घ्या. मग बोटांनी हलकेच रगडून घ्या. रव्याच्या दाणेदार टेक्शचरमुळे त्यावरील काळा थर लगेच निघून जाईल.

     

५. गाळण वापरा - मशरुम्सवरील काळ्या रंगाचा थर काढायचा असल्यास एका मोठ्या गाळणी मध्ये हे मशरुम्स काढून घ्या. नळाच्या पाण्याला फोर्स असल्यास या वाहत्या पाण्यात हे मशरुम्स चांगले धुवून घ्या. मग गाळणी तशीच ठेवून त्यातील जास्त पाणी नितळून जाऊ द्यात.

 

हे पण नक्की लक्षात ठेवा... 

१. ज्या दिवशी तुम्ही बाजारातून मशरुम्स खरेदी करून आणाल. शक्यतो त्याच दिवशी ते वापरा. जर तुम्हाला त्याच दिवशी ते वापरायचे नसल्यास त्याचे प्लॅस्टिक पॅकिंग उघडू नका. 

२. जर तुम्ही अनवधानाने हे पॅकिंग उघडले असेल तर हे मशरुम्स स्वच्छ धुवून मग संपूर्ण वाळवून घ्या. त्यानंतर हवाबंद डब्यात किंवा पिशवीत भरून रेफ्रिजरेट करा. यामुळे तुमचे मशरुम्स खराब न होता जास्त काळ टिकून राहतील.

टॅग्स :किचन टिप्सस्वच्छता टिप्स