सर्व भाज्यांमधे बटाटा सगळ्यांचा आवडताही आणि करायला सोपाही.पण उकडून बटाट्याची कोणतीही पाककृती करायची ठरली तर बटाटे उकडण्यास वेळ जातो. परत बटाटे हवे तसे शिजतीलच असे नाही. कधी कुकरला सहा सात शिट्या घेऊनही बटाटे कडक राहातात तर कधी चार शिट्यांमधेच बटाटे इतके शिजतात की ते फुटतात. असं होवू नये म्हणून बटाटे उकडण्याच्या दोन सोप्या पध्दती आहेत. या पध्दतीने बटाटे उकडल्यास आपल्याला हवे तसे आणि पटकन उकडलेले बटाटे मिळतात.
Image: Google
5 मिनिटात बटाटे उकडण्यासाठी
1. कुकरमधे उकडताना..
कुकरमधे उकडले तरी बटाटे उकडण्यासाठी साधारणत: 12 ते 15 मिनिटं लागतात. पण पाच मिनिटात बटाटे उकडण्यासाठी सर्वात आधी एकाच आकाराचे बटाटे घ्यावेत. बटाटे एक दोन वेळा पाण्यानं चांगले धुवून घ्यावेत. बटाटे उकडायला टाकण्याआधी छिलून घेऊ नये. बटाटे धुतल्यानंतर ते कुकरमधे ठेवावे. त्यात पानी, मीठ आणि लिंबाचा तुकडा टाकावा. कुकरचं झाकण लावून कुकर मोठ्या आचेवर ठेवावा. दोन ते तीन मिनिटाच्या आतच कुकरला वाफ धरते. कुकरची एक शिट्टी झाली की गॅस बंद करावा. बटाटे उकडताना बेतानंच पाणी घालावं. पाणी बेताचं घातल्यानं कुकरची वाफ लवकर निघून जाते. आणि लिंबामुळे बटाटे शिजताना फाटत नाही.
Image: Google
2. मायक्रोवेवमधे उकडताना..
मायक्रोवेवमधे बटाटे उकडताना बटाटे धुवून स्वच्छ करावेत. मायक्रोवेव सेफ डिशमधे बटाटे ठेवून त्यात पाणी घालावं. ही डिश मायक्रोवेवमधे ठेवावी. मायक्रोवेव हायवर करुन 7 मिनिटं बटाटे उकडावेत. सात मिनिटानंतर मायक्रोवेव बंद करावा. बटाटे एक मिनिट त्यातच ठेवावेत. एक मिनिटानंतर उकडलेले बटाटे मायक्रोवेवमधून काढून घ्यावेत.