थंडीच्या दिवसांत सतत गरमागरम काहीतरी खावसं वाटतं. गारेगार पोळी-भाजी अजिबात नको होऊन जाते. त्यातही आपण ऑफीसला जात असू तर ही पोळीभाजी खायचा फारच कंटाळा येतो. अजिबातच नकोशी होते. मग अशावेळी तोंडी लावायला काहीतरी असले तर जेवण जाते. नेहमीचेच चटणी, लोणचे, सलाड यापेक्षा वेगळे काहीतरी असेल तर जेवणात रंगत येते. मग जेवताना फरसाण किंवा तत्सम काहीतरी घेण्यापेक्षा सुरण, वांगी, बटाटा, कच्ची केळी यांचे काप हा यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो.
अगदी झटपट होणारे हे काप जेवणाची रंगत वाढवतात आणि चवीलाही मस्त लागतात. त्यामुळे पोळी-भाजी कधी आणि कशी संपते आपल्या लक्षातही येत नाही. थंडीच्या दिवसांत बाजारात सुरण, वांगी, कच्ची केळी, बटाटा या गोष्टी अगदी सहज उपलब्ध होतात. हे काप शॅलोफ्राय करण्यासाठी तेल लागते मग ते आरोग्यासाठी चांगले का असे आपल्याला वाटते. पण थंडीच्या दिवसांत शरीराला स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असल्याने ते सहज पचते. तसेच घरचे तेल आपण एकदाच वापरतो. बाहेरच्यासारखे पुन्हा पुन्हा वापरत नाही. त्यामुळे कसलीही चिंता न करता करायलाही अगदी सोपे असलेले हे काप तुम्ही नक्की ट्राय करुन बघा.
साहित्य :
१. सुरण, बटाटा, वांगी किंवा कच्ची केळी २. बारीक रवा३. तांदळाची पिठी४. तिखट५. मीठ६. तेल
कृती :
१. बटाटा, सुरण, केळी यांची साले काढून घ्या. वांगी सालासकट घेतली तरी चालतात.
२. काही वेळ हे पाण्यात भिजवून ठेवा म्हणजे हे काळे पडणार नाही आणि थोडे भिजट झाल्याने लवकर शिजायला मदत होईल.
३. सुरण थोडे जास्त कडक असल्याने तुम्ही काप केल्यानंतर ते कुकरमध्ये २ दोन शिट्ट्या घेऊन शिजवून घेतल्यास चांगले. इतर गोष्टी शिजवून घ्यायची गरज नाही.
४. बारीक रवा, तांदळाचे पीठ, मीठ आणि तिखट एकत्र करा.
५. हे काप या मिश्रणात व्यवस्थित घोळवून घ्या.
६. तव्यावर किंवा फ्राय पॅनवर तेल गालून हे काप त्यावर घाला. चांगले लाल होईपर्यंत परतून घ्या.
७. असेच दुसऱ्या बाजुनेही परतून घ्या.