Join us  

चविष्ट आणि पौष्टिक दुधी भोपळ्याचं भरीत, खाऊन तर बघा नावडता भोपळाही होईल आवडता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 7:26 PM

भोपळ्याची भाजी आवडत नसली तर भोपळा खाण्याचा पर्यायच संपतो असं नाही. भोपळ्याचं भरीत हा भोपळ्याच्या भाजीचा चविष्ट प्रकार असून हा प्रकार खाऊन बघितल्यास आवडेल हे नक्की!

ठळक मुद्देभोपळ्याचं भरीत खाल्ल्यानं वजन नियंत्रित राहातं.उन्हाळ्यात थंड गुणधर्माच्या भोपळ्याचं भरीत अवश्य खावं.भोपळ्याचं भरीत करताना भोपळा वांग्यासारखा गॅसवर भाजून घ्यावा लागतो. 

निरोगी आरोग्यासाठी आहार तज्ज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ भोपळा खाण्याचा सल्ला देतातच. पण भोपळ्याची भाजी कितीही पौष्टिक असली तरी न खाण्याचा निर्धारही अनेकांनी केलेला असतो. भोपळ्याची साधी फोडणी दिलेली/ कोरडी/ डाळ घालून केलेली/ दाण्याचं कूट लावून केलेली रस्सा भाजी या कोणत्याच स्वरुपात भोपळ्याची भाजी आवडत नसली तर भोपळ्याची भाजी खाण्याचा पर्यायच संपतो असं नाही. भोपळ्याचं भरीत हा भोपळ्याच्या भाजीचा चविष्ट प्रकार असून हा प्रकार खाऊन बघितल्यास आवडेल हे नक्की. केवळ चविष्टपणा एवढाच भोपळ्याच्या भरताचा गुण नसून भोपळ्याचं भरीत हे आरोग्यदायी देखील आहे. 

Image: Google

भोपळ्याचं भरीत का खावं?

1. भोपळ्याचं भरीत खाल्ल्यानं मनावरचा ताण कमी होतो. भोपळ्यात पाणी भरपूर असतं त्यामुळे शरीर थंड राहतं. भोपळ्यात औषधी गुणधर्म असल्यानं शरीराला आरामही मिळतो. 

2. भोपळा खाल्ल्यानं वजन नियंत्रणात राहातं. भोपळ्याचं भरीत खाल्ल्यानंही हा फायदा मिळतो. भोपळ्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं. भोपळ्याची भाजी किंवा भरीत खाल्ल्यानं लवकर भूक लागत नाही त्यामुळे वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते. 

3. भोपळ्यातील गुणधर्म पचनास मदत करतात. भोपळ्यात असलेल्या फायबरमुळे पचन क्रिया सुधारते. पोटात गॅस होणं, ॲसिडिटी, बध्दकोष्ठता या समस्यांवर भोपळ गुणकरी आहे. पचनाशी निगडित समस्या भोपळ्याचं भरीत खाल्ल्यानेही दूर होतात. 

Image: Google

4. त्वचेसाठीही भोपळा फायदेशीर असतो. भोपळ्याची भाजी किंवा भरीत खाल्ल्यानं शरीरातील विषारी घटक शरीराच्या बाहेर टाकले जातात. त्वचा चमकदार आणि सुंदर करण्यासाठी भोपळ्याचं भरीत अवश्य खावं.

5. भोपळा हा गुणानं शीत असल्यानं उन्हाळ्यात भोपळ्याची भाजी अवश्य खावी. भोपळ्याची भाजी किंवा भरीत खाल्ल्यानं शरीर आतून आर्द्र आणि थंड राहातं.

Image: Google

भोपळ्याचं भरीत कसं करावं?

भोपळ्याचं भरीत् करण्यासाठी  भोपळा धुवून पुसून् घ्यावा. भोपळ्याला तेलाचा हात लावून भोपळा गॅसवर ठेवून भाजावा. भोपळ्याची साल व्यवस्थित काळी होवू द्यावी. भाजलेला भोपळा थंड झाला की त्याची काळी साल काढून घ्यावी. भोपळ्याचे छोटे तुकडे करुन मिक्सरमधून ओबडधोबड वाटून घ्यावेत. 

Image: Google

फोडणीसाठी कढईत तेल गरम् करावं. तेल गरम झाल्यावर त्याला मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यावी. लसणाची पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा घालून तो चांगला परतावा. कांदा थोडा परतला गेल्यावर त्यात थोडी हिरवी मिरची चिरुन घालावी. कांदा परतला गेला की त्यात टमाटा घालून तो मऊसर परतून घ्यावा.  त्यात लाल तिखट , हळद आणि मीठ घालावं. मिश्रण चांगलं परतून घ्यावं. नंतर त्यात मिक्सरमधून ओबडधोबड वाटलेला भोपळा घालावा.  भोपळा फोडणीत चांगला मिसळून घ्यावा. 4-5 मिनिटं भोपळा शिजू द्यावा. भरतात सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तूप घालून भरीत चांगलं परतून गॅस बंद करावा. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आहार योजनापाककृती