Join us  

दूधी कोफ्ता करी रेसिपी - पदार्थ असा भारी की दूधी भोपळा न आवडणारेही खातील चवीचवीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2023 11:10 AM

Bottle Gourd Dudhi Bhopla Kofta Curry Recipe : आरोग्यासाठी फायदेशीर असलेला भोपळा आवर्जून खायला हवा...

आरोग्य उत्तम राहावं यासाठी आहारात सगळ्या प्रकारच्या भाज्या, फळं, धान्य, कडधान्य असायला हवीत असं आपण अनेकदा ऐकतो. बहुतांशवेळा आपण सकस आणि पौष्टीक आहार घेण्याचा प्रयत्नही करतो. पण काही भाज्या पाहिल्या की आपल्याला त्या अजिबात खाण्याची इच्छा होत नाही. दुधी भोपळा हा यातलाच एक. दुधीची भाजी म्हटली की लहान मुलांपासून सगळेच नाक मुरडतात. शिजल्यावर थोडी मऊसर होणारी ही भाजी अनेकांना आवडत नाही. पण भोपळा आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो. त्यामुळे आहारात नियमितपणे भोपळ्याचा समावेश करायला हवा असे आपण ऐकतो. याच भोपळ्याचे थोडे वेगळे आणि चविष्ट असे काही करता आले तर? भोपळा पोटात गेला हे कळणारही नाही आणि तरीही मस्त वेगळं आणि चमचमीत काहीतरी खायला मिळालं याचाही आपल्याला आनंद घेता येईल. पाहूयात ही भोपळ्याची कोफ्ता करी कशी करायची (Bottle Gourd Dudhi Bhopla Kofta Curry Recipe) .

१. दुधी भोपळा स्वच्छ धुवून त्याची साले काढून तो किसून घ्यायचा.

२. त्यामध्ये बेसन, तांदळाचे पीठ, तिखट, मीठ, धणेजीरे पावडर घालून हे सगळे चांगले एकजीव करायचे. 

३. हे कोफ्ते तेलात चांगले लालसर रंगावर तळून घ्यायचे. 

४. दुसरीकडे कांदा, टॉमॅटो, आलं, लसूण, खोबरं यांचं वाटण मिक्सरमधून काढून घ्यायचं.

५. फोडणी करुन त्यामध्ये हे वाटण घालायचे आणि गोडा मसाला, कांदा-लसूण मसाला, तिखट, मीठ, चवीपुरता गूळ घालायचे. 

६. अंदाजे पातळसर करी होईल इतके पाणी घालून हे मिश्रण चांगले उकळू द्यायचे. 

७. उकळी आली की गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून द्यायचे. 

८. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एका वाटीत ही ग्रेव्ही घ्यायची.

९. या गरमागरम ग्रेव्हीमध्ये तळलेले कोफ्ते घालायचे आणि पोळी, पुऱ्या किंवा भाकरीसोबत ही भाजी खायची. 

१०. अतिशय चविष्ट आणि हटके अशी ही कोफ्ता करी सगळेच आवडीने खातात आणि भोपळ्याचा वापर केला आहे हेही कोणाच्या लक्षात येत नाही. 

टॅग्स :अन्नभाज्यापाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.