रायते किंवा कोशिंबीरी म्हणजे जेवणाच्या ताटाची श्रीमंती. हे पदार्थ ताटात असले की, आपोआपच जेवणाची मजा वाढत जाते. चमचमीत भाजी, गरमागरम पोळ्या, तोंडी लावायला लोणच्याची फोड किंवा चटणी असली तरी रायते आणि कोशिंबीरीची जागा कुणीही भरून काढू शकत नाही. कोशिंबीर आणि रायते जेवणाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. असाच एक मस्त आणि जेवणाची रंगत वाढविणारा पदार्थ आहे भोपळ्याचे रायते. करायला अतिशय सोपे आणि आरोग्यासाठी अतिपौष्टिक असे अफलातून कॉम्बिनेशन असलेले दुधी भोपळ्याचे रायते एकदा करून बघाच...
रायते बनविण्यासाठी लागणारे पदार्थदुधी भोपळा, दही, मीठ, जीरे, मोहरी, तेल, कोथिंबीर, लाल मिरची, चिमुटभर साखर, चाट मसाला
कसे बनवायचे रायते
१. सगळ्यात आधी तर दुधी भोपळ्याची साले काढून तो उभा चिरा. त्याचे चार उभे काप करा. आता भाजी करताना ज्याप्रमाणे मधला पांढरा बियांचा भाग काढून टाकतो, तसा काढून बारीक बारीक फोडी करून घ्या. २. बारीक चिरलेल्या फोडी कुकरच्या डब्यात टाका. या डब्यात पुन्हा पाणी टाकू नये. फक्त कुकरच्या तळाशी असलेले पाणीच वाफ येण्यासाठी पुरेसे आहे.
३. कुकरच्या दोन शिट्टया झाल्या की गॅस बंद करा.४. कुकर थंड झाल्यावर वाफवलेल्या दुधी भोपळ्याच्या फोडी एका बाऊलमध्ये काढून थंड होऊ द्या. ५. फोडी थंड झाल्यानंतरच त्यात घट्ट आणि चांगल्या पद्धतीने फेटलेले दही, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर आणि थोडासा चाट मसाला टाका. ६. आता सगळे पदार्थ टाकून झाल्यानंतर शेवटी वरून मोहरी, जीरे, हिंग आणि एखादी वाळलेली लाल मिरची टाकून खमंग फोडणी घाला आणि पटापट सगळ्यांना सर्व्ह करा.