दुधी भोपळा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. त्यामुळे आठवड्यातून किमान २ वेळा दुधी भओपळा आवर्जून खायला हवा असे सांगितले जाते. मात्र दुधीची भाजी म्हटली की नकळत घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचेच चेहरे वाकडे होतात. मग महिला कधी या दुधीचा हलवा करतात तर कधी कोफ्ते करुन त्याची भाजी करतात. दुधीची थालिपीठं, पराठेही अतिशय छान लागतात. ही भाजी पोटात जावी यासाठी महिलांना काही ना काही शक्कल लढवावीच लागते. वेगवेगळे प्रयोग करुन भाजी पोटात कशी जाईल असा प्रयत्न त्यांच्याकडून होत असतो. आज यामध्ये आणखी एका रेसिपीची भर पडणार आहे. दुधी भोपळा भरताच्या वांग्यासारखा गॅसवर भाजून घेऊन त्याची भाजी कशी करायची पाहूया. ही भाजी झटपट तर होते पण चविष्टही होत असल्याने सगळेच आवडीने खातात (Bottol Gourd Dudhi Bhopla Sabji Recipe).
१. दुधी भोपळा घेऊन त्याला सुरीने उभे बारीक काप द्यायचे. त्यावर ब्रशने तेल लावायचे.
२. हा भोपळा आणि लसणाची १ कांडी हे दोन्ही गॅसवर चांगले काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचे.
३. भोपळ्याची साले काढायची आणि त्याचे तुकडे करुन तो ग्राइंडरमध्ये चांगला बारी क करायचा.
४. वांग्याचे भरीत करताना वांगे ज्याप्रमाणे वाटून घेतो तसे भोपळ्याचे करायचे.
५. यासोबत भाजलेला लसूणही साले काढून त्याच्या पाकळ्या करुन घ्यायच्या.
६. कढईत तेल घेऊन त्यात जीरे, ठेचलेला लसूण, कांदा, बारीक चिरलेली मिरची घालून चांगले परतून घ्यावे.
७. यामध्ये तिखट, मसाला, धणेजीरे पावडर, कसुरी मेथी आणि थोडे बेसन घालून हे सगळे पुन्हा चांगले परतून घ्यावे.
८. सगळ्यात शेवटी टोमॅटो घालून यामध्ये बारीक केलेला दुधी भोपळा घालायचा आणि मीठ घालून एकसारखे करायचे.
९. साधारण ४ ते ५ मिनीटे १ वाफ येईपर्यंत कढईवर झाकण ठेवायचे आणि मग गॅस बंद करुन भाजी पोळीसोबत खायला घ्यायची.