गेले काही दिवस दुपारनंतर अचानक अंधारुन येतं आणि संध्याकाळच्या वेळेला बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडतो. पावसाळ्यात तर हे चित्र नेहमीचंच असतं. अशावेळी आपल्याला चहासोबत चमचमीत- गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं. मग कधी आपण मॅगी करतो तर कधी कांदा किंवा बटाट्याची भजी. मात्र या दोन्हीपेक्षा थोडा वेगळा आणि हटके पदार्थ करायचा असेल तर घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून आपण हे बॉल्स करु शकतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे हे बॉल्स चवीला तर छान लागतातच पण झटपट होत असल्याने फारसे कष्टही लागत नाहीत. कुरकुरीत असे हे बॉल हिरवी चटणी किंवा सॉससोबत अतिशय चविष्ट लागतात. पाहूयात हे बॉल्स कसे करायचे (Bread Aloo Balls Recipe)...
साहित्य -
१. उकडलेले बटाटे - २
२. कांदा - १
३. मिरची - २
४. कोथिंबीर - अर्धी वाटी
५. पुदीना - अर्धी वाटी
६. आलं - १ इंच
७. तिखट - अर्धा चमचा
८. जीरा पावडर - अर्धा चमचा
९. चाट मसाला - पाव चमचा
१०. किचन किंग मसाला - अर्धा चमचा
११. मीठ - चवीनुसार
१२. ब्रेड - १० स्लाईस
१३. तेल - १ वाटी
कृती -
१. बटाटे उकडून हाताने स्मॅश करुन घ्यावेत.
२. यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना, मिरचीचे तुकडे घालावेत.
३. यामध्ये चाट मसाला, जीरा मसाला, तिखट, किचन किंग मसाला आणि मीठ घालून सगळे चांगले एकजीव करुन घ्यावे.
४. ब्रेडच्या कडा काढून मधला भाग पाण्यात थोडा ओलसर करावा.
५. या ब्रेडच्या ओल्या स्लाईसवर बटाट्याच्या मिश्रणाचा गोळा ठेवून ब्रेडने हा गोळा बंद करुन घ्यावा.
६. हे बॉल्स तेलात चांगले खरपूस होईपर्यंत तळून घ्यावेत आणि गरमागरम खायला घ्यावेत