डब्याला सारखी भाजी पोळी खाऊन मुलं कंटाळतात. त्यांना डब्यात काहीतरी वेगळं हवं असतं. आणि भाजी पोळीसारखी पौष्टिकता इतर कशातून मिळेल हा पर्याय सूचत नसल्यानं आयांन भाजी पोळीशिवाय दुसरं काही सूचत नाही. मी डब्बा खाणार नाही आणि तुला डब्बा खावा लागेल या स्वरुपाची भांडणं जवळ जवळ प्रत्येकाच्या घरी ठरलेली. यावर हसत खेळत मार्ग काढायचा असल्यास भाजी पोळीला पर्याय म्हणून एखाद्या दिवशी तरी पौष्टिकतेला त्याच तोडीचा पण वेगळा पदार्थ (healthy food for tiffin box) देता यायला हवा. मुलांच्या डब्यासाठी वेगळा खाऊ, झटपट होणारा पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ म्हणजे ब्रेड उत्तपम (bread uttampam). यात वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश करता येत असल्यानं हा पदार्थ पौष्टिक होतो. ब्रेड उत्तपम केवळ मुलांसाठीच उत्तम आहे असं नाही तर वजन कमी करणाऱ्यांसाठीही (weight loss recipe) हा पदार्थ फायदेशीर आहे.
Image: Google
ब्रेड उत्तपम कसा करायचा?
ब्रेड उत्तपम तयार करण्यासाठी 2 ब्रेड स्लाइस, अर्धा कप रवा, अर्धा कप दही, 1 मोठा चमचा बारीक किसलेलं आलं, एक बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, हिरवी मिरची, बारीक चिरलेला टमाटा, चवीनुसार मीठ आणि साजूक तूप घ्यावं.
Image: Google
ब्रेड उत्तपम तयार करताना सर्वात आधी रवा आणि दही एकत्र करुन घ्यावं. सर्व बारीक चिरलेल्या भाज्या एकत्र कराव्यात. त्यात मीठ घालून मिश्रण एकजीव करावं. मिश्रण तयार झालं की ब्रेडच्या कडा काढाव्यात. ब्रेडच्या मध्यभागी थोडा पाण्याचा हात लावावा. त्यामुळे ब्रेड मऊ होतो. ब्रेडवर रव्याची पेस्ट लावावी. तवा गरम करावा. आधी ब्रेडची खालची बाजू भाजावी. नंतर रव्याची पेस्ट लावलेली बाजू तव्यावर घालून ती चांगली शेकून घ्यावी. ब्रेडच्या दोन्ही बाजू नीट शेकायला हव्यात. ब्रेड भाजताना साजूक तूप घालावं. हे ब्रेड उत्तपम टमाटा साॅस सोबत किंवा कोथिंबीर पुदिन्याच्या चटणीसोबत छान लागतो. ब्रेड उत्तपमची पौष्टिकता वाढवण्यासाठी साध्या ब्रेडऐवजी ब्राउन ब्रेड घ्यावा. असा हा चवीला चटपटीत ब्रेड उत्तपम मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडेल.