Join us  

ब्रेकफास्टला करा रवा ढोकळ्याचा चविष्ट बेत, कमीत कमी पदार्थांत १५ मिनीटांत रेसिपी तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2023 4:29 PM

Breakfast Rava Dhokla Recipe : सकाळच्या घाईत झटपट होणारा सोपा पर्याय

ठळक मुद्देगरमागरम आंबट-गोड ढोकळा चिंचेची चटणी किंवा हिरव्या चटणीसोबत छान लागतो. झटपट होणारा पदार्थ असल्याने सकाळच्या घाईत आपण नक्की ट्राय करु शकतो...

रोज सकाळी ब्रेकफास्टला काय करायचं असा यक्षप्रश्न तमाम महिलांसमोर असतोच. सारखं पोहे-उपीट खाऊन कंटाळा येतो आणि पोळीही नको वाटते. अशावेळी झटपट होतील, सगळ्यांना आवडतील आणि पोटही भरेल असे पदार्थ आपल्याला सुचतातच असं नाही. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून होणारे, हेल्दी आणि तरीही चविष्ट असे पदार्थ करायचे म्हणजे महिलावर्गापुढे एक टास्क असतो. पण थोडं नियोजन केलं तर अगदी झटपट असे काही पदार्थ आपण नक्की करु शकतो. सकाळच्या वेळात स्वयंपाक, आवराआवरी, डबे, ऑफीसला जाण्याची घाई असल्याने झटपट होईल असा पदार्थ हवा असतो. पाहूया रव्यापासून करता येतील अशा पांढऱ्या ढोकळ्याची सोपी रेसिपी (Breakfast Rava Dhokla Recipe)...

साहित्य -

१. रवा -१ वाटी 

२. दही - अर्धी वाटी 

(Image : Google)

३. मीठ - चवीनुसार 

४. आलं-मिरची पेस्ट - १ चमचा 

५. इनो किंवा खायचा सोडा - अर्धी वाटी 

६. साखर - अर्धा चमचा 

७. तेल - २ चमचे 

८. खोबरं - कोथिंबीर - अर्धी वाटी

९. जिरं - अर्धा चमचा 

१०. हिंग - पाव चमचा

११. कडीपत्ता - ७ ते ८ पानं 

कृती -

१. रव्यामध्ये दही घालून तो चांगला फेटून घ्यावा. 

२. त्यात मीठ, साखर, आलं-मिरची घालून थोडे पाणी घालून एकजीव करावे. 

३. इनो किंवा खायचा सोडा घालून पुन्हा थोडे पाणी घालून मिश्रण १० ते १५ मिनीटे बाजूला ठेवावे. 

४. कुकरच्या भांड्याला तेल लावून त्यामध्ये हे मिश्रण घालावे.

५. कुकरला शिट्टी न लावता मध्यम आचेवर ही भांडी कुकरमध्ये ठेवावीत. 

६. साधारण १५ ते २० मिनीटांत ढोकळा चांगला फुलतो. 

७. बाहेर काढल्यानंतर ढोकळा गार होऊ द्यावा. 

८. त्यानंतर कढईत तेल घालून त्यात जीरं, हिंग, कडीपत्ता घालून फोडणी करावी.

९. ही फोडणी गार झाली की त्यात थोडं पाणी घालावं. 

१०. ढोकळ्याचे एकसारखे चौकोनी काप करुन त्यावर फोडणी आणि खोबरं-कोथिंबीर घालावी. 

११. गरमागरम आंबट-गोड ढोकळा चिंचेची चटणी किंवा हिरव्या चटणीसोबत छान लागतो. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.