सॅण्डविज हा एक मस्त ब्रेकफास्ट आहे. जेवढा टेस्टी तेवढाच हेल्दी. सॅण्डविजची एक खासियत म्हणजे दोन ब्रेडच्या आत आपण खूप वेगवेगळ्या भाज्या दडवू शकतो. जी मुलं एरवी भाज्या खाण्याचा कंटाळा करतात, ती मुलं विविध भाज्या घालून बनविलेले सॅण्डविज मात्र अवघ्या काही मिनिटात फस्त करतात. त्यामुळे यम्मी खायला मिळतंय म्हणून मुलंही खुश आणि मुलांना भरपूर भाज्या खाऊ घातल्या म्हणून त्यांची आईही खुश...
सॅण्डविज बनविण्याच्या खूप रेसिपीज आहेत. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने सॅण्डविज बनवतं. आज आपण सुपर व्हेजी सॅण्डविजची रेसिपी करणार आहोत. या सॅण्डविजचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी कमी पदार्थांमध्ये हे बनवता येतं. सामान्यपणे सॅण्डविज बनवायचं म्हणजे टोमॅटो सॉस, पुदिना चटणी, चीज हे पदार्थ अगदी मस्ट असतात. पण हे पदार्थ न घालताही सुपर हेल्दी सॅण्डविज बनवता येतं.
सुपर व्हेजी सॅण्डविजसाठी लागणारे साहित्य
ब्रेड, सिमला मिरची, गाजर, कोबी, कांदा, बीट, काकडी, वाफवलेले स्वीटकॉर्न, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो, मेयोनिज, बटर
कसं बनवायचं सुपर व्हेजी सॅण्डविज ?
१. सगळ्यात आधी तर हे सॅण्डविज बनविण्यासाठी आपण स्वीटकॉर्न व्यतिरिक्त सगळ्या भाज्या कच्च्याच वापरणार आहोत.
२. त्यामुळे सगळ्या भाज्या लहान लहान चौकोनी तुकड्यांमध्ये कापून घ्या.
३. यानंतर या सगळ्या चिरलेल्या भाज्या एका बाऊलमध्ये टाका आणि त्यामध्ये मेयोनिज टाका.
४. सगळ्या भाज्यांच्या तुकड्यांना व्यवस्थित मेयोनिज लागले पाहिजे. मेयोनिज हा या रेसिपीचा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे अगदी मोकळया हाताने मेयोनिज वापरावे.
५. यानंतर एक ब्रेडची स्लाईस घ्यावी. यामध्ये मेयोनिज घालून मिक्स केलेले भाज्यांचे मिश्रण टाकावे.
६. भाज्या भरपूर टाकाव्यात. त्यामुळे ब्रेड कमी आणि भाज्या जास्त खाल्ल्या जातात.
७. यानंतर या भाज्यांवर चिलीफ्लेक्स आणि ओरिगॅनो टाकावे.
८. यानंतर वरून आणखी एक ब्रेडची स्लाईस लावावी.
९. दोन्ही ब्रेडच्या स्लाईसला बाहेरच्या बाजूने बटर लावून घ्यावे आणि सॅण्डविज ग्रील करावे.
१०. गरमागरम सुपर व्हेजी सॅण्डविज सर्व्ह करावे.