कधी सिरीयल बार, तर कधी व्हीट ब्रेड, कधी कॉर्नफ्लेक्स तर कधी मॅगी अशा ब्रेकफास्टने आपल्या दिवसाची सुरुवात होते. पोट भरण्यासाठी हे पदार्थ चांगले असले तरी आरोग्यासाठी मात्र नियमितपणे या पदार्थांचे सेवन करणे योग्य नाही. दिवसभर एनर्जी टिकवून ठेवायची असेल आणि आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर सकाळचा पहिला आहार हा पोटभरीचा तर हवाच पण तो हेल्दी असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ब्रेकफास्ट हा दिवसभराच्या आहारातील सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो. सकाळी एखदा भरपूर एनर्जी मिळाली की आपण दिवसभर वेगवेगळी कामे करायला सज्ज होतो. त्यामुळे हेल्दी आणि पोषक असा ब्रेकफास्ट असेल तर दिवस सुरु करणे जास्त सोपे जाते.
शेफ मेघना हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रोटीन पॅक ब्रेकफास्ट असे म्हणत ही रेसिपी शेअर केली आहे. दाण्याच्या डोसाची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करुन बघा, तुम्हालाही आवडेल. शेंगदाण्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण तर चांगले असतेच पण नैसर्गिक फॅटस आणि फायबर्सही चांगल्या प्रमाणात असल्याने शरीराचे चांगल्यारितीने पोषण होण्यासाठी दाणे अतिशय उपयुक्त ठरतात. पिनट बटरपासून ते दाण्याच्या पारंपरिक चटणीपर्यंत दाण्यापासून जगभरात तयार केले जाणारे पदार्थ आरोग्यासाठी उपयुक्त असतात. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या घटकांपासून तयार होणारा हा डोसा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा आहे. पाहूया दाण्याच्या डोसाची ही हटके रेसिपी...
साहित्य –
दाणे – अर्धी वाटी (भाजून पाण्यात भिजवलेले)आलं – एक पेर (बारीक चिरलेले)पाणी – एक कपमिरची – २ बारीक चिरलेल्याबेसन – अर्धी वाटीतांदळाचे पीठ – अर्धी वाटीमीठ – चवीनुसारजीरे – १ चमचाहळद – अर्धा चमचा तेल कांदा, टोमॅटो, कोथिंबीर – बारीक चिरलेली आवडीनुसार
कृती
१. भिजलेले दाणे आणि थोडे पाणी एकत्र करिन मिक्सर करुन घ्या
२. याची बारीक पेस्ट झाली की त्यातच दोन्ही पीठे, आलं-मिरची, हळद, मीठ, जीरे घालून पुन्हा थोडे पाणी घालून फिरवून घ्या.
३. डोसाचे पीठ असते त्याप्रमाणे एकसारखे पीठ होईल याची काळजी घ्या.
४. तव्यावर तेल घालून डोसाप्रमाणे हे पीठ घाला.
५. त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आपल्या आवडीप्रमाणे घाला.
६. दुसऱ्या बाजूनेही तेल घालून चांगले भाजून घ्या
७. खोबऱ्याच्या चटणीबरोबर हा डोसा अतिशय छान लागतो.