ओल्या नारळाचे गोड, तिखट असे अनेक पदार्थ तयार करता येतात. ओल्या नारळाचं दूध वापरुन केलेल्या पदार्थांना छान चव येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओल्या नारळाचा छोटा तुकडा भाजी आमटीला लावला की हवी असणारी चव आणि हवा असणारा दाटसरपणा येतो. हे सर्व ठीक आहे, पण सगळ्यात मोठी अडचण येते ती नारळ फोडताना, नारळातून खोबरं वेगळं करताना आणि नारळाचं दूध काढताना. या तिन्ही गोष्टी बहुतेकांना अवघड जातात. त्यामुळे नको ते ओल्या नारळाचे पदार्थ असं वाटायला लागतं. नारळ फोडताना जवळ वाटी ग्लास घेऊन बसलं तरी पाणी वायाच जातं. नारळ फोडलं की एक नारळाच्या तुकडा हातात एक दूर कुठेतरी जाऊन पडतो. पाणी सगळं जमिनीवर सांडतं. मग खोबरं काढण्यासाठी चाकू घेतला जातो. तो नारळात कमी आणि हातातच जास्त वेळा खुपतो. नारळ फोडण्याच्या आणि नारळातून खोबरं काढण्याच्या या जखमा बराच काळ वेदना देत राहतात.
Image: Google
ओलं नारळ खरंतर एवढी चविष्ट आणि पौष्टिक बाब. पण ती एवढी वेदनादायी आणि नकोशी होण्याची खरंतर काहीच गरज नाही. यासाठी खूप सोपे उपाय आहेत. प्रसिध्द आणि स्टार शेफ संजीव कपूर आणि इतर अनेकांनी नारळ फोडण्याच्या , नारळातून खोबरं वेगळं करण्याच्या आणि नारळातून घट्टसर दूध काढण्याच्या सोप्या पध्दती सांगितल्या आहेत. केवळ नारळ फोडणं जिवावर येतं म्हणून पौष्टिक नारळापासून आपण दुरावा राखत असू तर या युक्ता करुन बघायलाच हव्यात. यामुळे ओल्या नारळाचे, नारळाचं दूध घालून करावयाचे पदार्थ करताना ओल्या नारळाचं टेन्शन येणार नाही.
कसं फोडायचं नारळ?
1. नारळ फोडण्यासाठी आधी नारळाच्या शेंड्या काढून घ्याव्यात. नारळाचा वरचा भाग जितका शक्य तितका स्वच्छ आणि मऊ करावा. हे नारळ दोन ते तीन तास फ्रिजमध्ये ठेवावा . नारळ बाहेर काढून बत्त्याने सर्व बाजूने ठोकून मग ते फोडावं. यामुळे नारळ फोडलं की नारळातून खोबरं पटकन वेगळं होतं.
2. समजा दुसऱ्या दिवशी ओल्या नारळाचे काही पदार्थ करायचे आहेत. मग आदल्या दिवशी नारळाच्या शेंड्या काढाव्यात. नारळ एका प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून फ्रिजरमधे 12 तास ठेवावं. दुसऱ्या दिवशी नारळ फ्रिजरमधून बाहेर काढलं की मुसळाने किंवा दगडाने सगळ्या बाजूने हलक्या हातानं ठोकून मग नारळ फोडावं. यामुळे नारळातून खोबरं सहज वेगळं होईल.
Image: Google
3. नारळ फोडताना पाणी वाया जातं आणि नारळही हवं तसं नीट फुटत नाही. यासाठी आधी नारळाच्या शेंड्या काढून घ्याव्यात. नारळाच्या शेंड्याच्या खाली जे तीन छिद्रं असतात ज्याला डोळे असं म्हटलं जातं. यातलं एक छिद्र मऊ असतं. या छिद्रातून नारळ न फोडता पाणी काढण्यासाठी स्क्रू ड्रायव्हरची मदत घ्यावी. स्क्रू ड्रायव्हर नारळाच्या मऊ छिद्रात घालून आधी पाणी काढून घ्यावं. नंतर नारळावर जाडसर आणि गडद रेषा दिसतात. त्या रेषेवर बत्त्याने किंवा दगडाच्या सहाय्यानं ठोकल्यास नारळ बरोबर दोन भागात फुटतं. मग हे नारळाचे दोन तुकडे प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून अर्धा एकतास फ्रिजमधे ठेवावं. फ्रिजमधलं नारळं बाहेर काढून चाकुच्या सहाय्याने विना दुखापत आणि विनासायास नारळातलं खोबरं बाहेर काढता येतं.
4. शेफ संजीव कपूर यांनी सांगितलेली पध्दतही अफलातून आहे. ते सांगतात त्या प्रमाणे आधी नारळाच्या शेंड्या काढून घ्याव्यात.नारळाच्या छिद्रातून पाणी काढून घ्यावं. नारळ फोडून घ्याव. नारळाचे तुकडे गॅसवर ठेवावेत. दोन तीन मिनिटात नारळाचं टणक कवचं तडकतं. गॅस बंद करावा. खोबरं नारळापासून सहज वेगळं होतं.
Image: Google
नारळाचं घट्ट दूध कसं करावं?
1. वर सांगितल्याप्रमाणे कोणतीही युक्ती वापरुन नारळ फोडावं, नारळातलं खोबरं वेगळं करावं. खोबरं धुवून घ्यावं. खोबऱ्याचे बारीक तुकडे करावेत.
2. 3 कप खोबऱ्याचे तुकडे असतील तर चार कप पाणी घ्यावं . गरम पाण्यात खोबऱ्याचे तुकडे 15-20 मिनिटं भिजवावेत.
Image: Google
3. खोबऱ्याचे तुकडे मिक्सरमधून वाटताना थोडे थोडे घालून वाटावेत.अगदीच घट्ट दूध हवं असेल तर खोबरं वाटताना अडचण आली तरच थोड्या पाण्याचा उपयोग करावा. नाहीतर पाण्याविना खोबरं नीट बारीक झालं तर ते गाळणीत वाटलेलं खोबरं दाबून दूध काढावं. जर दूध खूप घट्ट हवं नसेल तर मग थोडं थोडं पाणी घालून खोबरं वाटावं. वाटलेलं खोबरं दाबून दूध काढून पुन्हा तो चव थोडं पाणी घालून मिक्सरमधून काढावा. गाळणीत चव दाबून दूध काढावं. आणि पुन्हा एकदा थोडं पाणी घालून मिक्सरमधे वाटावा. गाळणीत दाबून दूध काढावं. चहाच्या गाळणीनं हे दूध एकदा गाळून घ्यावं की नारळाच्ं दूध तयार होतं.