Join us  

श्रावणात कुट्टुचं महत्त्व मोठं, हे कुट्टु काय असतं? उपवासाला ते खाणं तब्येतीसाठी पोषक , ते कसं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2021 3:34 PM

कुट्टुचं पीठ आरोग्यास अनेक अंगाने लाभदायक असतं. कुट्टुच्या पिठात पोषक तत्त्वं भरपूर प्रमाणात असतात.कुटटुत असलेल्या गुणधर्मांचा फायदा आपलं आरोग्य चांगलं होण्यासाठी करायचा असेल तर कुट्टुच्या पिठाचे विविध पदार्थ करा आणि खा. कुट्टुच्या पिठाची उपवासाची पोळी, पुरी, पराठे , पकोडे आणि धिरडे जितके पौष्टिक असतात तितकेच ते चविष्टही असतात.

ठळक मुद्देकुट्टुत असलेले फायटो न्युट्रिएंट कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात.हाडं आणि दात मजबूत करण्यासाठी कुट्टुतील गुणधर्मांची भूमिका खूप महत्त्वाची असते.कुट्टुत असलेले गुणधर्म हदयाचं आरोग्य चांगलं राखतात.

  श्रावणातल्या सोमवारी कुट्टुच्या पिठाला खूप महत्त्व आहे. अनेकजण श्रावण सोमवारी उपवास करतात. उपवासाला फळं आणि कुट्टुच्या पिठाचे पदार्थ खातात. कुट्टुच्या पिठापासून उपवासाची पुरी, पराठे, पकोडे आणि धिरडे तयार करता येतात. कुट्टु हे खरंतर हिंदी नाव आहे. याला मराठीत विशिष्ट नाव नसून इंग्रजीत याला बकव्हीट असं म्हणतात. कुट्टु हा काही धान्य प्रकार नाही.कुट्टुचं छोटसं झाड असतं. त्याला त्रिकोणी आकाराची फळं येतात. ही फळं कुटून हे कुट्टुचं पीठ तयार होतं. भारतात ही कुट्टुची शेती जम्मू काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड आणि दक्षिणेत नीलगिरी पर्वतावर तर उत्तरेकडील राज्यातही केली जाते.

छायाचित्र- गुगल 

पौष्टिक कुट्टु* श्रावणात कुट्टुच्या पिठाचे पदार्थ खाण्यास विशेष महत्त्व आहे.हे कुट्टुचं पीठ आरोग्यास अनेक अंगाने लाभदायक असतं. कुट्टुच्या पिठात पोषक तत्त्वं भरपूर प्रमाणात असतात. यात प्रथिनं, मॅग्नेशिअम, ब जीवनसत्त्व, लोह, कॅल्शियम, फोलेट, झिंक, मॅग्नीज आणि फॉस्फरस हे महत्त्वाचे घटक असतात. कुट्टुत असलेले फायटोन्युट्रिएंटकोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात.

* कुट्टुत फायबर भरपूर प्रमाणात असतं. हे फायबर रक्तातील साखरेचं प्रमाण वेगानं वाढण्यास प्रतिबंध करतं. कुट्टुत मधुमेह विरोधी लढणारे घटक असतात यामुळे टाइप 2मधुमेह नियत्रित राहातो.

छायाचित्र- गुगल 

* कुट्टुत असलेल्या प्रथिनांचं प्रमाण पित्ताशयात खडे होऊ देत नाही.शिवाय कोलेस्ट्रॉलही ही कमी करतात. कुट्टुच्या सेवनामुळे शरीरात बाइल नामक अँसिड तयार होतं. यामुळे पित्ताशयात खडे होण्याचा धोका टळतो.

* मॅग्नेशिअयमचं प्रमाण कुट्टुत भरपूर असतं. यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही कुट्टु सेवनाचा फायदा होतो.

* नियासिन, फॉलेट, ब,ब6 ही जीवनसत्त्वं कुट्टुत असतात. हे घटक आरोग्यास अतिशय लाभदायक असतात. कुट्टुत असलेल्या ब जीवनसत्त्वामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित राहातं. आणि नियासिनमुळे चांगलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण सुधारतं. रक्तवाहिन्यांचं काम व्यवस्थित होतं. याचा फायदा हदयाचं आरोग्य चांगलं राहाण्यात होतो.

छायाचित्र- गुगल 

* हाडं आणि दात मजबूत करण्यासाठी कुट्टुतील गुणधर्मांची भूमिका खूप महत्त्वाची असते. कुट्टुत कॅल्शियम, प्रथिनं, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशिअम हे घटक भरपूर असतात. या घटकांमुळे शरीरातील हाडं आणि दात मजबूत होतात.

कुटटुत असलेल्या या गुणधर्मांचा फायदा आपलं आरोग्य चांगलं होण्यासाठी करायचा असेल तर कुट्टुच्या पिठाचे विविध पदार्थ करा. कुट्टुच्या पिठाची उपवासाची पोळी, पुरी, पराठे, पकोडे आणि धिरडे जितके पौष्टिक असतात तितकेच ते चविष्टही असतात.