गेल्या काही दिवसांत उन्हाचा तडाखा वाढायला लागला आहे. त्यामुळे आपल्याला सतत पाणी पाणी होते आणि अन्न जात नाही. उन्हाळ्यात घामाघूम झाल्याने फारसे काही खावेसे वाटत नाही. मात्र खाल्ले नाही तर अंगात शक्ती तरी कशी राहणार. त्यामुळे आवश्यक तेवढे तरी
खावेच लागते. दुपारच्या उन्हातून घरी आलो किंवा ऑफीसमध्ये असलो तरी जेवण नको वाटतं. अशावेळी काकडी, ताक असे काही ना काही सोबत घेऊन आपण जेवण करतो. यावेळी ताटात तोंडी लावण्यासाठी चविष्ट काही असेल तर जेवण जायला मदत होते. कोशिंबीर किंवा रायता हा पारंपरिक पदार्थ असला तरी त्याला थोडा ट्विस्ट देऊन आपण ही रेसिपी हटके करु शकतो. बुंदी रायता ही अशीच जेवणाची रंगत वाढवणारी आणि झटपट होणारी सोपी रेसिपी. अगदी काही मिनीटांत होणारी ही रेसिपी कशी करायची पाहूया (Bundi Or Farsan Raita Recipe)...
साहित्य -
१. बुंदी/फरसाण - २ वाट्या
२. दही - १ वाटी
३. साखर - १ चमचा
४. मीठ- चवीनुसार
५. चिंचेची चटणी - २ चमचे
६. तिखट - अर्धा चमचा
७. चाट मसाला - पाव चमचा
८. कोथिंबीर - अर्धी वाटी
कृती -
१. दही चांगले फेटून त्यामध्ये मीठ, साखर, तिखट आणि चाट मसाला घाला.
२. बुंदी किंवा फरसाण घेऊन त्यावर थोडी चिंचेची चटणी घाला.
३. मग त्यावर आवडीनुसार हे दह्याचे मिश्रण घालून कोथिंबीर घाला.
४. हे सगळे आधीच घालून न ठेवता ताटात वाढताना घालावे. म्हणजे त्याचा कुरकुरीतपणा तसाच राहतो आणि ते छान लागते.
५. या दह्यात आपण आवडीनुसार काकडी, कांदा, डाळींबाचे दाणे, उकडलेला बटाटा असे काहीही घालू शकतो.
६. नेहमीची पारंपरिक कोशिंबीर करण्यपेक्षा रायत्याचा हा प्रकार खायला नक्कीच छान लागतो आणि जेवणाची रंगत वाढवणारा ठरतो.