बहुतेकांच्या नावडत्या भाजीच्या यादीत भोपळ्यानं अव्वल क्रमांक पटकावलेला असतो. खरंतर भाज्यांमधे भोपळा अगदी गुणी आहे पण तरीही ते नावडतं आहे हे विशेष. भोपळ्यात राइबोफ्ल्वेनिन, झिंक, लोह, मॅग्नेशियम, क, ब यासारखी महत्त्वाची जीवनसत्त्वं आहेत. भोपळ्या आपल्या शरीरातला ओलावा टिकवून धरतो, पचन क्रिया सुधारतो शिवाय आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे वजन. भोपळ्यानं वजनही कमी होतं. तरीही भाजीला भोपळा करायचं म्हटलं तर कपाळावर आढ्याच पडतात. या आढ्या काढण्याचा पर्याय म्हणजे भोपळ्याचे चविष्ट पदार्थ करणं. भोपळ्याची बर्फी ही पौष्टिक आणि चविष्ट असते. ती करायलाही अगदीच सोपी आहे.
भोपळ्याची बर्फी करण्यासाठी दोन छोटे भोपळे, एक प्याला दूध, अर्धा कप साखर, दोन चमचे गावरान तूप, एक चमचा काजू बदामाचा कूट आणि दोनशे ग्राम पनीर
बर्फी कशी करणार?
सर्वात आधी भोपळा छिलून घ्यावा. भोपळ्यातल्या बिया काढून टाकाव्यात. भोपळा किसून घ्यावा. भोपळ्याचा किस पिळून घेऊन त्यातलं पाणी काढून टाकावं. एका कढईत दोन चमचे तूप घालून किसलेला भोपळा त्यात टाकावा. मध्यम आचेवर भोपळा पाच मिनिटं परतून घ्यावा. भोपळ्यातलं सर्व पाणी निघून जायला हवं. मिक्सरच्या भांड्यात दूध, साखर, किसलेलं पनीर, काजू बदामाचा कूट एकत्र करुन ते मिक्सरला फिरवून घ्यावं.
दुधाचं मिश्रण भोपळ्याच्या किसमधे टाकवं. हे मिश्रण भोपळ्यात एकजीव होईपर्यंत परतत राहावं. कढईच्या कडेला मिश्रण सुटु लागलं आणि त्याचा घट्ट गोळा होत आला की गॅस बंद करावा. एका पसरट ताटाला तूप लावून त्यात हे मिश्रण टाकावं. हातानं किंवा वाटीनं ते गोल थापावं. फार पातळ थापू नये. बर्फी एवढी जाडी ठेवावी. थापलेलं मिश्रण गार होण्यासाठी फ्रीजमधे ठेवावं. हवंतर त्यावर सुकामेवा सजावटीसाठी थापून लावू शकतो. साधारण अर्धा पाऊण तासानंतर मिश्रण थंड होतं. वड्या पाडण्यासाठी तयार होतं. ही भोपळ्याची बर्फी करुन खाल्ली तर भोपळाही नक्कीच आवडायला लागेल.