Join us  

कोबीचे चमचमीत वडे : टेस्ट अशी की कोबीची भाजी पचपचीत लागते म्हणणारेही खातील आवडीने, पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 5:03 PM

चहाच्या वेळी किंवा एखादवेळी नाश्त्याला अतिशय झटपट होणारा हा पदार्थ नक्की ट्राय करा, कोबी तर खाल्ला जाईलच पण सगळे एकदम खूश

ठळक मुद्देझटपट होणारी हटके रेसिपी ट्राय करुन पाहा...कोबीमुळे नाकं मुरडणारे होतील खूश सारखं वेगळं आणि चटपटीत काय करायचं असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर ही घ्या रेसिपी...

कोबीची भाजी म्हटली की घरात सगळ्यांची नाके मुरडली जातात. पण कोबी खाण्याचे बरेच फायदे आहेत. सारखी कोणती भाजी करायची किंवा नाश्त्याला आणि एरवीही सारखं वेगळं काय करायचं असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर कोबी वडे हा अतिशय उत्तम उपाय आहे. झटपट होणारे आणि चविष्ट लागणारे हे गरमागरम वडे खाल्ले की एकदम मस्त वाटतं. यामुळे मूड तर फ्रेश होतोच पण डाळ आणि कोबी पोटात गेल्याने पौष्टीक खायला दिल्याचे समाधानही मिळते. सुट्टीच्या दिवशी नाश्त्याला, चारच्या चहाच्या वेळी किंवा अगदी एखादवेळी जेवताना भजींना पर्याय म्हणूनही हे वडे अगदी सहज करता येतात. कमीत कमी पदार्थांत होणारे हे वडे तुम्ही एकदा नक्की ट्राय करुन पाहा. लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेजण अगदी आवडीने खातील असा हा पदार्थ आहे.

(Image : Google)

साहित्य -

१. कोबी - पाव किलो २. आलं, मिरची, लसूण पेस्ट - १ चमचा ३. हरभरा डाळ - दिड वाटी ४. धने-जीरे पावडर - १ चमचा ५. लिंबाचा रस - १ चमचा ६. साखर - चवीपुरती७. मीठ - चवीपुरते ८. कोथिंबीर - अर्धी वाटी - बारीक चिरलेली९. तेल

(Image : Google)

कृती -

१. कोबी बारीक चिरुन घ्यावा. बारीक चिरणे शक्य नसेल तर हल्ली मशीन येते त्या मशीनमधून काढावा, नाहीतर सरळ मिक्सरमधून काढून घ्यावा.

२. हरभरा डाळ वडे करण्याच्या ४ ते ५ तास आधी भिजत घालावी.

३. हरभरा डाळ आणि आलं, मिरची, लसूण एकत्र वाटून घ्यावे.

४. डाळीचे वाटण कोबीमध्ये घालावे, त्यात धने-जीरे पावडर, कोथिंबीर, लिंबाचा रस चवीपुरती साखऱ आणि मीठ घालून एकजीव करावे. 

५. हातावर एकसारखे वडे थापावेत.

६. गुलाबीसर रंग येईपर्यंत तळावेत. 

७. हे वडे हिरवी चटणी, सॉस, दही कशासोबतही अतिशय मस्त लागतात.   

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.