Join us  

ऊस, आवळा, चिंच, तीळगूळ, बोरं हे थंडीत खाता की नाक मुरडता?खा पारंपरिक सुपरफूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2021 11:09 AM

थंडी आहे म्हणून सतत चहा-कॉफी पिण्यापेक्षा रानात मिळणारी फळं खाल्ली तर आरोग्य चांगले राहायला मदत होईल

ठळक मुद्देपॅकेट फूड खाण्यापेक्षा थंडीत खा हा रानमेवा...आवळा, चिंचा, बोरं खायलाच हवीत, तब्येत राहील ठणठणीत

हिवाळा म्हटलं की तब्येत कमावण्याचा काळ. मग व्यायाम, भरपूर झोप आणि एकाहून एक पदार्थांवर ताव. यामुळे तब्येत सुधारण्यासाठी हा कालावधी एकदम चांगला. थंडीच्या या दिवसांत गारठ्याचा आणि इतर कोणताही त्रास होऊ नये यासाठी निसर्ग या काळात भरभरुन देतो. एकीकडे निसर्ग आपल्याला देत असताना आपण त्याचा चांगला उपयोग करायला नको का? थंडीच्या दिवसांत तब्येत ठणठणीत राहायला हवी आणि हिवाळा छान आनंदी जावा यासाठी आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर यांनी याबाबत सांगितले आहे. या काळात सहज उपलब्ध होणारे नैसर्गिक घटक आहारात घेतले तर तुमच्या आरोग्याला त्याचा नक्कीच फायदा होईल. आवळा, चिंच यांमध्ये असणारे सी व्हिटॅमिन तसेच मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखे घटक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. चहा-कॉफी किंवा पॅकेट फूड खाण्यापेक्षा नैसर्गिकरित्या पिकलेला रानमेवा खाल्ल्यास तब्येत चांगली राहायला मदत होते. पाहूयात हे पदार्थ कोणते आणि त्याचा कसा फायदा होतो....

(Image : Google)

ऊस - ऊसाचा रस हा सहज उपलब्ध होणारे पेय आहे. तसेच हल्ली बाजारात ऊसाची कापलेली पेरंही मिळतात. ऊसामुळे शरीर डिटॉक्स व्हायला मदत होते. हल्ली आपण डिटॉक्स करण्यासाठी मॉडर्न पद्धती वापरतो पण त्यापेक्षा ऊसाचा रस प्यायल्यास शरीर चांगल्या रितीने डिटॉक्स होते. यामुळे यकृताचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. तसेच थंडीच्या दिवसांत त्वचा चांगली राहण्यासाठी ऊस अतिशय फायदेशीर ठरतो. 

बोरं - तब्येत चांगली ठेवायची असेल तर तुमची प्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक असते. लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे ते सतत आजारी पडतात. पण बोरं खाल्ल्यास प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच भारतीय आहारातील विविधता आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने प्रत्येक घटकाचा आहारात समावेश असायला हवा. 

(Image : Google)

चिंच - आपण आमटी किंवा एखाद्या भाजीत आंबट चवीसाठी चिंच वापरतो. पण त्याशिवायही चिंच खायला हवी. चिंच खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते, थंडीच्या दिवसांत होणारा बद्धकोष्ठतेचा त्रास चिंचेमुळे कमी होतो. चवीला आंबट-गोड चिंच नुसती मीठ लावून खाल्ल्यास तोंडाला चव येते.

आवळा - आवळ्याला थंडीतील आहाराचा राजा म्हटले जाते. आवळ्यातील गुणधर्म उत्तम आरोग्यासाठी चांगले असतात. त्यामुळे या काळात च्यवनप्राश, मोरावळा, आवळा कँडी, आवळा सरबत किंवा अगदी नुसता आवळा खाणेही फायद्याचेच असते. आवळा खाल्ल्याने विविध इन्फेक्शन्सपासून आपला बचाव होण्यास मदत होते. 

तीळगूळ - तीळ आणि गुळ हे दोन्हीही घटक उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात शरीरात ऊब निर्माण होण्यासाठी हे घटक फायदेशीर असतात. तीळगूळामुळे शरीरातील लोह, कॅल्शियम यांसारखे घटक वाढण्यास मदत होते. त्यामुळेच आपल्याकडे संक्रांतीला एकमेकांना तीळगूळ देण्याची पद्धत आहे. तेव्हा आहारात या दोन्ही घटकांचा आवर्जून समावेश करायला हवा. 

 

टॅग्स :अन्नथंडीत त्वचेची काळजीआहार योजनाआरोग्य