७५ व्या कान्स फिल्म फेस्टीव्हलला नुकतीच फ्रान्समध्ये सुरुवात झाली असून जगभरातील सितारे याठिकाणी पोहोचले आहेत. अतिशय ग्लॅमर असणाऱ्या या महोत्सवात भारताला सन्मानाचा देश म्हणून दर्जा मिळाला आहे. अशाप्रकारे सन्मान होणारा भारत हा पहिला देश आहे. या महोत्सवाच्या कार्यक्रमाची सुरूवात केंद्रिय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकार उपस्थित होते. यामध्ये पूजा हेगडे, तमन्ना भाटिया, नयनतारा, ए.आर. रेहमान, प्रसून जोशी, नवाजुद्दीन सिद्दकी, रिकी केज, शेखर कपूर, वाणी त्रिपाठी, आर माधवन आणि मामे खान सहभागी होते. अनुराग सिंह ठाकूर यांनी पाहुण्यांसाठी खास डिनरचे आयोजन केले होते (Cannes Film Festival 2022).
या डिनरमध्ये मान्यवरांसाठी खास भारतीय पदार्थांची रेलचेल होती. यामध्ये भारताच्या जवळपास सर्व भागात खाल्ली जाणारी दाल-खिचडी ते खिचडीसोबत खाल्ली जाणारी गुजरातची आंबट - गोड कढी आणि उत्तर भारतात प्रसिद्ध असलेली गट्ट्याची भाजी या पदार्थांवर उपस्थितांनी ताव मानला. स्वीट डिशमध्ये दूधापासून तयार केला जाणारा खास कलाकंद करण्यात आला होता. तर मध्यप्रदेशमध्ये केली जाणारी कचोरी सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. भारतीय स्नॅक्समध्ये आवडीने खाल्ली जाणारी ही कचोरी देशभरात सर्वांच्या आवडीचा विषय आहे. यामध्ये गोल सुकी कचोरी, ताजी गरमागरम कचोरी असे वेगवेगळे प्रकार देशाच्या विविध भागांत केले जातात. पण कान्स फेस्टीव्हलमध्ये केली गेलेली उत्तर भारतीय स्टाईलची कांदा कचोरी अतिशय स्वादिष्ट असल्याचे म्हटले जात आहे. या कचोरीमध्ये कांद्याबरोबरच बेसन, काळं मीठ, चाट मसाला, गरम मसाला, लाल तिखट यांचे सारण करुन भरण्यात आले होते. पाहूयात या कचोरीची खास रेसिपी...
साहित्य -
१. बटाटे - २ उकडलेले
२. कांदा - २ ते ३ बारीक चिरलेले
३. बेसन - ३ चमचे
४. हिंग - अर्धा चमचा
५. तेल - १ चमचा
६. धने पावडर - २ चमचे
७. तिखट - १ चमचा
८. काळे मीठ - १ चमचा
९. चाट मसाला - १ चमचा
१०. गरम मसाला - अर्धा चमचा
११. मैदा - २ वाटी
१२. तेल - ६ चमचे
१३. मीठ - चवीनुसार
१४. ओवा - अर्धा चमचा
कृती -
१. कढईमध्ये तेल गरम करुन घ्या, त्यामध्ये धने पावडर आणि हिंग घाला.
२. काही मिनीटांनी यामध्ये बेसन, तिखट, चाट मसाला, गरम मसाला, काळं मीठ घालून सगळे एकसारखे परतून घ्या.
३. यामध्ये कांदा घालून तोही चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्या.
४. कांदा मऊ झाल्यानंतर यामध्ये बटाटे आणि मीठ घालून पुन्हा हे मिश्रण एकजीव करुन घ्या.
५. एका भांड्यात मैदा घेऊन त्यामध्ये तेल आणि ओवा घाला. हे सगळे पाणी घालून एकजीव करुन पीठ चांगले मळून घ्या. या पीठावर अर्धा तासासाठी एक ओले फडके घालून ठेवा.
६. या पीठाचे लहान आकाराचे गोळे करुन त्यामध्ये कांदा, बटाटा यांचे तयार केलेले मिश्रण भरा. हातानेच याची जाडसर पुरी करा. हे जास्त पातळ झाले तर कचोरी फुलत नाही आणि मिश्रणही बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळे जाडसर कचोरी तयार करुन घ्या.
७. कढईत तेल घेऊन त्यामध्ये या कचोऱ्या तळून काढा. जाडसर केल्यामुळे त्या छान फुगतील. गरमागरम कचोरी चिंचेची चटणी किंवा मिरचीच्या ठेच्यासोबत खायला घ्या.