Join us  

कोशिंबीर पचत नाही, करपट ढेकर येतात? खाऊन पाहा, ‘चटका कोशिंबीर’-पचायला हलकी आणि चविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2022 3:54 PM

अनेकांना कोशिंबीर खाल्ली की पित्ताचा त्रास होतो, पचत नाही अशावेळी हा सॅलेडचा खास पर्याय.

ठळक मुद्देआवडेल ते घालता येते. पोटभरीचेही होते आणि पचायलाही सोयीचे जाते.

काकडीची, टमाट्याची कोशिंबीर आपण नेहमी करतो. नुसतं चकत्या चिरुन खाण्यापेक्षा पारंपरिक कोशिंबीरी चवीला चांगल्या लागतात. मात्र अनेकांना कच्ची काकडी, टोमॅटो पचत नाही. पण कोशिंबीर तर पोटात जायला हवी. मग त्यावर हा उपाय करुन पहा. याला म्हणूय चटका कोशिंबीर. म्हणजे आपण काकडी, टमाटे, कोबी, केळी, सफरचंद, उकडलेले मूग, बीट यासाऱ्याची आपण कोशिंबीर करतोच.मात्र हे सारं कच्चे न घेता आपल्याला त्याला चटका द्यायचा आहे.म्हणजे काय?

(Image : google)

तर ही घ्या कृती

काकडी नेहमीप्रमाणे चोचून किंवा चिरुन घ्यायची. तूप मिरची हिंग जिऱ्याची फोडणी करायची. त्यात काकडी घालायची. गॅस एकदम कमी ठेवायचा. आपल्याला काकडी शिजवायची नाही. जरा चटका बसला पाहिजे. मग त्यात दाण्याचा कूट किंवा नारळ घालायचा. कोथिंबीर घालायची. मीठ साखर. आणि मिनिटभर हे सारं चांगलं परतून लगेच गॅस बंद करायचा. मग लिंबू पिळा किंवा दही घाला.काकडीची चटका कोशिंबीर तयार.तेच आपण बारीक चिरलेला कोबीचं करु शकतो. टोमॅटोच्या मोठ्या फोडी, कांदा, उकडलेले मूग, उकडलेले किसलेले किंवा फोडी केलेले बीट हे सारंही असंच मिनिट-दोन मिनिट चटका देऊन कोशिंबीरीसारखं खाऊ शकतो.तुम्ही वजन कमी करत असाल किंवा आहारात भरपूर फायबर हवं, सॅलेड हवं असं वाटत असेल पण कच्चे खाल्ल्याने पित्त होत असेल किंवा करपट ढेकर येतात. पचत नाही. त्यावेळी ही किंचित चटका दिलेली, जरासं गरम केलेली कोशिंबीर उत्तम लागते.भाजीसारखं शिजवायचं मात्र नाही. चटका चटक्यासारखाच असला पाहिजे.

(Image : google)

फक्त गॅस सुरु असताना आणि खूप गरम असताना दही घालायचं नाही किंवा लिंबू पिळायचा नाही. दही गरम करायचं नाही.कढईतून दुसऱ्या भांड्यात पदार्थ काढून मग त्यात दही घाला. तुम्ही तुमच्या कल्पनाशक्ती आणि आवडीप्रमाणे यात भाज्या घालू शकता. कांद्याची पात, कांदा, कोवळी मेथी, पालेभाज्यांची पानं, उकडलेले मूग किंवा चणे, असे आवडेल ते घालता येते. पोटभरीचेही होते आणि पचायलाही सोयीचे जाते.

टॅग्स :अन्न