- मेघना सामंत
कधी आपण छानशा हॉटेलात जातो. मेन्यूकार्डवरचं एखादं ‘शाही’ नाव आपल्याला भुलवतं. ऑर्डर केल्यावर नखरेल वाडग्यात बसून ती डिश समोर येते, वरून काजू-बदामाची पखरण केलेली. पुलाव असो, रस्सेदार भाजी असो, खीर असो की आइसक्रीम, कुठल्याही पदार्थाला राजेशाही रूप द्यायचं असेल तर सोपी युक्ती म्हणजे वरून सुक्या मेव्याचा वर्षाव करणे. जितके काजू जास्त तितका तो पदार्थ मौल्यवान. आपल्याला वाटतं की हा मूळचा गोव्याचा; पण तसं नाहीये.
(छायाचित्र : गुगल)
काजूचं झाड ब्राझीलमधलं. १५६८ सालच्या सुमारास साहसी पोर्तुगीज दर्यावर्दी नव्या नव्या भूभागांचा शोध लावत होते, तेव्हा ब्राझीलच्या ईशान्य भागातली ही झाडं त्यांच्या नजरेस पडली. काजूफळाची लालपिवळी बोंडं त्यांना आकर्षक वाटली. अजब प्रकार म्हणजे फळाच्या टणक बिया आत नसून बाहेर लटकलेल्या दिसत होत्या. तिथल्या टुपी या आदिवासी जमातीचे लोक या बिया फोडून खात. गंमत म्हणजे त्यांनी हे ज्ञान तिथल्या जंगलातल्या वानरांकडून मिळवलं होतं. वानर एका विशिष्ट आकाराच्या दगडाने या बिया फोडून आतला गर खात असत. टुपी लोकांनीच पोर्तुगीजांना हे तंत्र शिकवलं. एकदाची ती युक्ती जमली, पोर्तुगीजांना काजूगरांची चव फारच आवडली. मग आपल्यासोबत जहाजात बसवून त्यांनी काजूला सर्वत्र नेलं. टुपी भाषेत या झाडाचं नाव ‘अकाजू’, त्याचंच पुढे झालं काजू. आफ्रिकेचा पूर्व किनारा, भारताचा पश्चिम किनारा इथलं हवापाणी, माती काजूच्या झाडाला मानवली. साल १५१० पासून गोव्यावर राज्य करणाऱ्या पोर्तुगीजांनी तिथेही काजूची झाडं लावली. पुढे या झाडाचा आणखी एक फायदा त्यांना समजला. या झाडांची मुळं माती घट्ट धरून ठेवतात. मग धोधो पावसात जमीन धुपून जाऊ नये म्हणून काजूची लागवड गोव्यात मोठ्या प्रमाणावर केली गेली.काजूने तमाम भारतीयांना भलतीच भूल घातली. काजूच्या कित्येक पाककृती इथल्या तरबेज गृहिणींनी घडवल्या.
(छायाचित्र : गुगल)
सोलणं कष्टप्रद असलं तरी ओल्या काजूगरांच्या उसळीसाठी जीव टाकणारे खाद्यप्रेमी आहेत इथे. बोन्डू म्हणजे काजूफळांची (शास्त्रीयदृष्ट्या ही फळं नसून देठ) फेणीही गोव्याच्या भूमीत बनवली गेली. काजूबागांचा आणि ते भाजून सोलून तयार करण्याचा व्यवसाय गोव्यात बहरला.
(लेखिका खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)