Join us  

आली होळी करा गारेगार थंडाई, गारव्यासोबतव मिळवा तब्येतीचे 5 फायदे, घ्या सोपी सुटसुटीत रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 6:42 PM

होळी, धुलिवंदनाच्या निमित्ताने उन्हाळ्यात थंडाई पिण्याला आरोग्याच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. शरीराला थंडावा आणि मनाला ऊर्जा देणारं पेयं घरच्याघरी सहज करता येतं.

ठळक मुद्देथंडाई पिल्याने शरीराला ऊर्जा मिळते, ताकद मिळते.थंडाईमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात त्यामुळे थंडाई उत्तम डिटाॅक्स ड्रिंकदेखील आहे.थंडाईमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. 

होळीला पुरणपोळीचा नैवेद्य आणि धुलिवंदन -रंगपंचमीला थंडाईचा बेत ही पध्दत परंपरेनुसार चालत आली आहे. पण थंडाई म्हणजे केवळ परंपरा नव्हे. रंगाचा उत्सव साजरा करताना हवं असणारं मस्त चवीचं थंड पेय एवढंच थंडाईला महत्त्व नाही. थंडाई म्हणजे केवळ कोल्ड ड्रिंक नव्हे. ते नुसतं कोल्ड ड्रिंक असतं तर त्याची चर्चा आयुर्वेदात झालीच नसते. थंडाई या पेयात औषधी गुणधर्म असल्यानं उन्हाळ्यात थंडाई पिण्याला खास महत्व आहे.  उन्हाचा त्रास , वजनाचा  आणि डिहायड्रेशनचा धोका कमी करुन शरीराला ऊर्जा - पोषण आणि मनाला आनंद देते. 

Image: Google

थंडाई का प्यावी?

1. थंडाईत असलेल्या खसखशीमुळे पोटातील आतड्यांची जळजळ कमी होते. बध्दकोष्ठतेचा समस्या दूर होते.

2. बडीशेप घातल्यानं थंडाईमुळे शरीराला आतून  थंडावा मिळतो. गॅसेसचा त्रास दूर होतो. बडीशेपेत दाहविरोधी गुणधर्म असल्याने पचनक्रिया सुधारते. 

3. थंडाई पिल्याने शरीराला ऊर्जा मिळते, ताकद मिळते. कारण् थंडाईत काजू बदाम यासोबतच टरबूज आणि भोपळ्याच्या बियासुध्दा असतात. या घटकांमुळे शरीराची ताकद वाढते. 

Image: Google

4. थंडाई करताना काळमिरी, दालचिनी यासारखे मसाल्याचे पदार्थ वापरले जातात. मसाल्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक असतात. तसेच थंडाईमुळे शारीरिक ताकदीसोबतच मानसिक ताकदही मिळते. थंडाईमध्ये ॲण्टिऑक्सिडेण्ट गुणधर्म असल्याने औदासिन्य विरोधातही थंडाई फायदेशीर ठरते. 

5. थंडाईता दूध, साखर/ गूळ, वेलची, जायफळ, काळिमिरी, कलौंजी, बडिशेप, खसखस, दालचिनी असे विविध पदार्थ घातलेले असतात. या घटकांचे स्वत:चे असलेले गुणधर्म थंडाईत समाविष्ट होवून थंडाईचे गुणधर्म वाढतात. थंडाईतील काजूमुळे थंडाईत फॅटस,ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. मिऱ्यांच्या समावेशामुळे  त्यातील पाईपरीन या घटकामुळे चवीसोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढते. आतड्यांचे आरोग्य सुधारतं. थंडाईत मॅगनीज, झिंक, कॅल्शियम, लोह आणि आ जीवनसत्व हे घटक असतात. थंडाईत मनुका टाकल्याने फायबर, ऊर्जा आणि खनिजं असतात. थंडाईनं शरीरातील हिमोग्लोबिन वाढतं. पचन सुधारतं. हदयाच्या आरोग्यासाठीही थंडाई फायदेशीर ठरते. थंडाई केवळ थंडं पेय आहे असं नाही तर थंडाईमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात त्यामुळे थंडाई उत्तम डिटाॅक्स ड्रिंकदेखील आहे.  थंडाईही थंडं प्यायली जाते. थंडं दूध हे ॲण्टासिड म्हणून काम करतं. थंडं दूध हे शरीराला थंडं ठेवतं म्हणूनच नैसर्गिक घटकांनी पोषक हे पेय उन्हाळ्यात थंडं पेयं म्हणून प्यायलं जातं. 

Image: Google

कशी करायची थंडाई?

थंडाई हे पोषक थंडं पेय तयार करण्यासाठी  1 लिटरलो फॅट दूध ,  दीड कप साखर, 1 मोठा चमचा बदाम, 1 चमचा काजू, 1 चमचा मनुके 1 चमचा कलौंजी, 2 छोटे चमचे खसखस, 1 चमचा काळमिरी, 2 मोठे चमचे बडिशेप, अर्धा चमचा वेलची पूड आणि 1 मोठा चमचा गुलकंद घ्यावं. 

थंडाई करताना आधी दूध तापवून उकळावं. आधी  पाण्यामध्ये साखर मिसळून मिश्रण उकळून घ्यावं.  2 कप पाणी घेऊन त्यात बदाम, कलौंजी, खसखस, मिरी, बडिशेप भिजवावी. हे सर्व 2 तास भिजत ठेवावं. दोन तासानंतर भिजवलेलं मिश्रण गुलकंदासोबत मिक्समधून वाटून त्याची पातळ पेस्ट करावी. मिक्सरऐवजी हे मिश्रण खलबत्ता किंवा पाट्यावर वाटल्यास थंडाई चविष्ट होते. वाटल्यानंतर हे मिश्रण सुती कापडातून गाळून घ्यावं. गाळलेल्या मिश्रणात  वेलची पूड घातलेलं दूध आणि  साखरेचा पाक घालावा. मिश्रण चांगलं व्यवस्थित हलवून घ्यावं. थंडाई फ्रिजमध्ये ठेवून थंडं करावी आणि मग प्यावी.

 

टॅग्स :अन्नकिचन टिप्सआहार योजना