आता बाजारामध्ये कैऱ्या विकत मिळायला लागल्या आहेत. (Chaitragauri Special: Traditional recipe of mango dal)आंबा खाण्यात मज्जा येतेच त्याला फळांचा राजा उगाचच म्हटले जात नाही. मात्र आंबे कितीही ताव मारून खाल्ले तरी, कैरी ती कैरीच. कैरी खाण्यात एक वेगळीच मज्जा आहे. छान हिरवीगार अशी कैरी कापून तिचे लांब लांब तुकडे तयार करायचे आणि मग लाल तिखट व मीठ लावायचे. मस्त मिटक्या मारत खायचे. (Chaitragauri Special: Traditional recipe of mango dal)कैरीचे विविध पदार्थ तयार करता येतात. त्यातील एक पदार्थ म्हणजे आंबे डाळ काही जण याला कैरी डाळही म्हणतात.
कोकणात तर आंब्याचा सिझन संपेपर्यंत ही डाळ सारखी तयार केली जाते. कैरी आणली की डाळ करायलाच हवी असा कोकणात नियम आहे. पद्धत मात्र वेगवेगळी असते. काही जण बारीक वाटतात. तर काहींना जरा जाडसर आवडते. फोडणीही वेगवेगळी दिली जाते. मात्र कोणत्याही पद्धतीने तयार करा आंबा डाळीला तोड नाही.
चैत्र महिन्यामध्ये चैत्र गौरीचे हळदी कुंकू ठेवले जाते. प्रत्येक गावात तसेच शहरात लहान मोठ्या प्रमाणावर हे हळदी कुंकू संपन्न होते. या कार्यक्रमामध्ये फळांची आणि खाद्यपदार्थांची आरास केली जाते. देवी पुढे विविध पदार्थ ठेऊन देवीच्या पायाशी खाद्यपदार्थांची सजावट केली जाते, ओळीच्या ओळी लावल्या जातात. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रसादासाठी तयार केलेली आंबे डाळ. चवीला तर मस्तच लागते. कितीही खा त्रासही होत नाही. ही डाळ तयार करायलाही फार सोपी असते. पाहा कशी करायची.
साहित्य
चणा डाळ, हिरवी मिरची, कैरी, मोहरी, लाल मिरची, हिरवी मिरची, तेल, जिरं, हळद, हिंग, कडीपत्ता, कोथिंबीर, आलं, मीठ
कृती
१. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये रात्रभर भिजवलेली चणा डाळ घ्या. त्यामध्ये चवीपुरते मीठ घाला. नंतर त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घाला. जर वाटीभर डाळ असेल तर ५ ते ६ मिरच्या वापरा. आल्याचा तुकडाही घ्या. मिश्रण जाडसर वाटून घ्या. डाळ जरा दाता खाली आली की छान लागते.
२. कैरी छान किसून घ्या. कैरी आणि वाटलेली डाळ एकजीव करून घ्या.
३. आता फोडणी तयार करून घ्या. तेल तापवत ठेवा. जरा गरम झाले की त्यामध्ये मोहरी घाला आणि तडतडू द्या. मोहरी तडतडली की मग त्यामध्ये हिंग घाला. हळद घाला, लाल मिरची घाला. जिरं घाला. कडीपत्ता घाला. सगळं छान परतलं की मग डाळीवर फोडणी टाका. कोथिंबीर बारीक चिरून टाका. सगळं एकजीव करून घ्या.