शुभा प्रभू साटम
चपाती चुरो. पदार्थाचं नाव ऐकून हा आपल्याकडचा पदार्थ असं वाटू शकतं. पण ही गोष्ट थोडी वेगळी आहे. चुरो हा स्पेन/पोर्तुगाल इथला गोड पदार्थ,आपल्याकडे कसे जिलबीवाले असतात नाक्यानाक्यावर तसेच चुरो विकणारे विक्रेते तिथं आढळून येतात. मैदा/मका यांच्या पिठाची गोड चकली असे साधारण वर्णन चुरोचे होते. हे चुरो कधी गोल, लांबट, वेढे असलेले असे असतात, त्यावर मध/कोको/चॉकलेट सॉस/पाक/सिनमन शुगर घालून खाल्लं जातं. हा चुरो अतिशय आवडता पदार्थ आहे. तर आज आपण या चुरोला भारतीय रुपडं देऊन एक वेगळा पदार्थ करू, झटपट आणि पौष्टिक पण. चुरोची ही भारतीय गोष्ट.
चपाती चुरो कसा करायचा?
साहित्य
पोळ्या : शक्यतो घडीची असल्यास बरी, माणशी एक अशी.
केळी: एका पोळीत अर्धे केळे, लहान केळं असल्यास एकच,
कोणताही जॅम/चॉकोलेट सॉस.
मैदा: दोन चमचे
टॉपिंग: मध/साखर पाक/व्हॅनिला आईस्क्रीम/सॉलटेड कॅरॅमल/चॉकलेट सॉस
/रबडी
अथवा दालचिनी कोरडी कुटून घ्या, ती रवाळ दळलेल्या साखरेत मिसळा, ही साखर वरून पेरा.
पाणी, तेल
कृती
मैदा पाण्यात कालवून जाडसर मिश्रण करून घेणे.
तेल तापवत ठेवणे
केळी मोठी असतील तर अर्धी करणे. (वेलची /छोटी केळी असतील तर बरं.)
पोळीला चॉकोलेट सॉस/जॅम लावून त्यात केळे भरून त्याचा रोल करा, कडा आत दुमडून मैदा +पाण्याने चिकटवून घ्या.
तापलेल्या तेलात हे रोल सोडून किंचित लालसर होईतो तळून घ्या.
समजा रोल करता आला नाही तर चक्क केळे भरून गोल करा आणि वरची बाजू एकत्र करून मैदा पाण्याने चिकटवुन टाका.
त्यावर मग हवं ते टॉपिंग घालून सर्व्ह करा
मस्त कुरकुरीत लागतात,फक्त गार झाले की मऊ पडतात.म्हणून लगेच खावे.
(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)