बिस्कीट हा आपल्या रोजच्या खाण्यातला एक महत्वाचा पदार्थ आहे. बिस्कीट हा असा पदार्थ आहे की ज्याला वर्षभर मागणी असते. हा असा पदार्थ आहे की जो आपण कधीही खाऊ शकतो. सकाळच्या नाश्त्याला, छोट्या भुकेसाठी, लहान मुलांना खाऊ म्हणून देण्यासाठी, पटकन काहीतरी गोड म्हणून तोंडात टाकण्यासाठी आपण बिस्किटच खातो. आजकाल बाजारात बिस्किटाचे विविध प्रकार आले आहेत. डायजेस्टिव्ह बिस्कीट, कुकीज, सॉल्टेड बिस्कीट, वेफर बिस्कीट यांसारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या बिस्कटांपासून आपण बिस्कीट केक, वेफर बिस्कीट असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. चला तर मग बिस्किटाची अजून एक रेसिपी ट्राय करून पाहू.(Chaska - Maska Biscuits Bites Recipe).
thepink.apron या इन्स्टाग्राम पेजवरून मस्का - चस्का बिस्कीट बाइट्स ही अनोखी रेसिपी शेअर करण्यात आली आहे.
साहित्य -
१. उकडलेला बटाटा - १/२ कप
२. गाजर - १/४ कप (किसलेलं)
३. बीट - १/४ कप (उकडून किसून घ्या.)
४. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
५. कांदा - १/४ कप (बारीक चिरलेला)
६. चीज - १/२ कप (किसलेलं)
७. टोमॅटो केचप - १ टेबलस्पून
८. आलू भुजिया - २ टेबलस्पून
९. मीठ - चवीनुसार
१०. संचर - चवीनुसार
११. पाव भाजी मसाला - २ टेबलस्पून
१२. लसूण पेस्ट - १ टेबलस्पून
१३. मस्का चस्का बिस्किट्स - १०
कृती -
१. एका बाऊलमध्ये उकडलेला बटाटा,गाजर, बीट, कांदा, कोथिंबीर, चीज, पाव भाजी मसाला, लसूण पेस्ट, मीठ, संचर हे सर्व साहित्य एकत्र करून घ्या.
२. हे तयार झालेलं मिश्रण मस्का चस्का बिस्किटवर लावून मग त्यावर अजून एक बिस्कीट ठेवा. हे मिश्रण असे भरा की, दोन बिस्किटांच्यामध्ये फिलिंग म्हणून हे सारण भरलं जाईल.
३. त्यानंतर एका डिशमध्ये टोमॅटो केचप काढून घ्या व या बिस्किटांच्या चारही कडा टोमॅटो केचपमध्ये रोल करून घ्या.
४. त्यानंतर हे बिस्कीट शेव किंवा आलू भुजियामध्ये घोळवून घ्या. टोमॅटो केचप लावलेल्या भागावर या भुजिया किंवा शेव आपोआप चिकटतील.
मस्का - चस्का बिस्कीट बाइट्स खाण्यासाठी तयार आहेत.