अनेक घरांमध्ये चार्तुमास सुरू झाला की कांदे, वांगे, लसूण खात नाहीत. काही घरांमध्ये चार्तुमासाचे (chaturmas) ४ महिने हा नियम पाळला जातो तर काही घरांमध्ये फक्त श्रावण महिन्यातच कांदे- वांगे- लसूण (food recipe without garlic and onion) बंद असतो. पदार्थाला चव आणण्यासाठी कांदे आणि लसूण अतिशय उपयुक्त ठरतो, हे अगदी खरं. त्यामुळे मसालेदार, चमचमीत (how to make spicy sabji) भाज्यांमध्ये हमखास कांद्यांचा आणि लसूणचा वापर केलेलाच असतो. पण हे दोन पदार्थ टाकले तरच भाज्या खमंग आणि चवदार होतात, असा अनेक जणींचा गैरसमज असतो. म्हणूनच ही घ्या एक कांदा- लसूण न वापरता केलेल्या टोमॅटो- बटाटा भाजीची एक चटकदार रेसिपी.
टोमॅटो- बटाटा भाजी रेसिपी
साहित्य
मध्यम आकाराचे दोन बटाटे, २ टोमॅटो, तेल, जिरे, हिरवी मिरची, हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट, धने पावडर, कसुरी मेथी, गरम मसाला, कोथिंबीर, तेजपान, लवंग, मिरेपूड आणि वेलची.
रेसिपी
- सगळ्यात आधी बटाटे उकडून घ्या. अगदी मऊसर होईपर्यंत उकडू नका. एखादी वाफ आली तरी पुरे.
- यानंतर टोमॅटो चिरून घ्या.
- उकडलेले बटाटे थंड झाले की ते ही सालं काढून बारीक चिरून घ्या.
- कढई तापायला ठेवा. त्यात तेल टाका. तेल तापलं की त्यात जिरे टाकून फोडणी करून घ्या. जिरे तडकले की वेलची, तेजपत्ता, लवंग आणि मिरेपूड टाका. सगळ्यात शेवटी हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून परतून घ्या.
- यानंतर चिरलेले टोमॅटो टाका, सगळं मिश्रण थोडंसं हलवून घ्या आणि झाकण लावून ठेवून द्या.
- जेव्हा टोमॅटो थोडेसे शिजल्यासारखे वाटतील तेव्हा त्यात हळद, धने पावडर, लाल तिखट टाकून परतून घ्या.
- जेव्हा टोमॅटो तेल सोडू लागतील तेव्हा त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी टाका. त्यात थोडं मीठ टाका आणि पुन्हा झाकण लावून काही वेळ वाफ येऊ द्या.
- काही वेळ शिजल्यानंतर त्यात पाणी टाका. पाण्याला उकळी यायला सुरुवात झाल्यावर सगळ्यात शेवटी गरम मसाला आणि कसुरी मेथी टाका.
- काही वेळ मंद आचेवर भाजी शिजली की सगळ्यात शेवटी चिरलेली कोथिंबीर टाकून गॅस बंद करा. कढईवर झाकण तसंच ठेवून भाजी थोडी सेट होऊ द्या. जेणेकरून मसाल्यांचा सुवास भाजीमध्ये अगदी छान मिसळून जाईल.
- अशी ही गरमागरम भाजी पोळीसोबत, पुरीसोबत किंवा भातासोबतही छान लागेल.