Join us  

चीज कॉर्न ओपन सॅन्डविच, नाश्त्याला उत्तम पदार्थ, पौष्टिक व चविष्ट रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2023 11:33 AM

Cheese Corn Open Sandwich Recipe : मक्याच्या दाण्यांचा व चीजचा वापर करून आपण चीझी कॉर्न ओपन सॅन्डविच घरी नक्की ट्राय करु शकता.

सकाळच्या नाश्त्याला आपण उपमा, पोहे, इडली, डोसा, सॅन्डविच असे अनेक पदार्थ खातो. या सगळ्या पदार्थांपैकी बऱ्याचजणांना नाश्त्याला सॅन्डविच खायला भरपूर आवडते. ब्रेडला बटर लावून त्यामध्ये आपल्या आवडीच्या भाज्या घालून मग सॉस सोबत खाऊ शकतो. असा हा नाश्त्याला झटपट तयार होणारा पदार्थ चवीला रुचकर आणि पौष्टिक असतो. टोस्ट सॅन्डविच, ग्रील सॅन्डविच, तंदुरी सॅन्डविच, व्हेज सॅन्डविच, चॉकलेट सॅन्डविच, अशा विविध रूपात सॅन्डविच तयार करता येते. आतापर्यंत आपण दोन ब्रेड स्लाईसच्या मधोमध भाज्यांचे स्टफिंग असलेले सॅन्डविच खाल्ले असेल. परंतु रोज तोच सॅन्डविचचा प्रकार खाऊन कंटाळा असाल तर मक्याच्या दाण्यांचा व चीजचा वापर करून आपण चीझी कॉर्न ओपन सॅन्डविच घरी नक्की ट्राय करु शकता(Cheese Corn Open Sandwich Recipe).

साहित्य :- 

१. मक्याचे दाणे - १ कप २. चीज - १ क्यूब (किसलेले चीज) ३. ओरेगॅनो - १/२ टेबलस्पून ४. चिली फ्लेक्स - १/२ टेबलस्पून ५. हिरवी मिरची - १/२ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेली)६. दूध - २ ते ३ टेबलस्पून ७. ब्रेड स्लाईस - ५ ते ६ (गरजेनुसार)८. बटर - २ टेबलस्पून

 

कृती :- १. एका मोठ्या बाऊलमध्ये मक्याचे दाणे, किसलेले चीज, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, हिरवी मिरची, दूध हे सर्व जिन्नस एकत्रित करुन घ्यावेत. २. ब्रेड स्लाईस घेऊन त्यावर तुमच्या आवडीनुसार बटर लावून घ्या. आता तयार केलेले मक्याचे स्टफिंग या ब्रेड स्लाईसवर व्यवस्थित अंथरून घ्यावे.  

३. जर आपल्याला हे चीज कॉर्न ओपन सॅन्डविच अधिक चीझी हवे असल्यास त्यावर किसलेले चीज घालावे. ४. आता एका पॅनमध्ये थोडेसे बटर घालून त्यावर हा ब्रेड स्लाईस ठेवून व्यवस्थित भाजून घ्यावा. ५. या पॅनवर २ मिनिटांसाठी झाकण ठेवावे जेणेकरून तयार होणाऱ्या वाफेने चीज वितळेल आणि सॅन्डविच अधिक चीझी होईल. ६. जर आपल्याकडे मायक्रोव्हेव ओव्हन असेल तर त्यात २ मिनिटांसाठी हे सॅन्डविच मायक्रोव्हेव करून घ्यावे. 

चीज कॉर्न ओपन सॅन्डविच खाण्यासाठी तयार आहे. आपल्या आवडीनुसार हे सॅन्डविच टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करु शकता.

टॅग्स :अन्नपाककृती