ब्रेकफास्ट हा आपल्या संपूर्ण दिवसातील डाएटमधला अतिशय महत्त्वपूर्ण भाग असतो. रात्रीचे जेवण आणि ब्रेकफास्ट यामध्ये मोठी गॅप असल्याने आपल्याला सकाळी दणकून भूकही लागते. मात्र बरेच जण सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफी पितात, त्यामुळे ही भूक मरुन जाते. काही जणांना चहा-पोळी किंवा फक्त चहा -बिस्कीट खाऊन बाहेर पडायची सवय असते. मात्र असे करणे आरोग्यासाठी चांगले नसते. मग रोज नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न आपल्यापुढे पडतो. पोहे किंवा उपीट यातून शरीराला विशेष पोषण मिळत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता हा पोटभरीचा आणि प्रोटीनयुक्त असावा असे सांगितले जाते. चीजमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे सकाळच्या घाईत झटपट होणारा चविष्ट असा चीज पराठा कसा करायचा पाहूया (Cheese Paratha Recipe For Breakfast)...
साहित्य -
१. गव्हाचे पीठ - १ वाटी
२. चीज स्लाईस - २ ते ३
३. चिली फ्लेक्स - अर्धा चमचा
४. ओरीगॅनो किंवा मिक्स्ड हर्ब - अर्धा चमचा
५. बटर किंवा तूप - २ चमचे
कृती -
१. आपण सकाळी पोळ्या करताना कणीक मळतो तीच कणीक थोडी जास्त मळायची.
२. या कणकेची गोल छोटी पोळी लाटायची आणि त्यावर चीज स्लाईस घालायचा.
३. त्यावर आवडीनुसार चिली फ्लेक्स आणि मिक्स्ड हर्ब घालून या पोळीची घडी घालायची.
४. वरुन थोडं तेल लावून हा पराठा हळूवार लाटायचा.
५. तव्यावर बटर किंवा तूप लावून हा पराठा चांगला खरपूस भाजायचा
६. लहान मुलांना चीज आवडत असल्याने ते हा पराठा अतिशय आवडीने खातील.
७. चीज, ओरीगॅनो किंवा मिक्स्ड हर्ब असल्याने पिझ्झाचा स्वाद येतो.
८. आवडीनुसार तुम्ही यामध्ये कोथिंबीर, कसुरी मेथी, मिरपूड, लसूण असे काहीही घालू शकता.