दिवाळी संपली आणि गोडाधोडाची जेवणंही संपली. सतत फराळ, मिठाई आणि मिष्टान्न खाऊन आपलं तोंड गोड झालेलं असेल आणि या वीकेंडला हेल्दी आणि तरीही चविष्ट असं काही करायचा प्लॅन असेल तर व्हेज अफगाणी ही डीश तुमच्यासाठी नक्कीच परफेक्ट पर्याय असू शकते. वीकेंडला राहीलेला भाऊबीज किंवा गेट टू गेदरचा एखादा प्लॅन असेल तर त्यावेळीही तुम्ही ही डीश करु शकता. प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी नुकतीच या पनीर अफगाणीची रेसिपी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. पोळी, रोटी अशा कशासोबतही ही भाजी अतिशय छान लागत असून तुम्ही जीरा राईस, पुलाव यांसोबतही ही भाजी पेअर करु शकता. चला पाहूया हॉटेल स्टाईल पनीर अफगाणी भाजी कशी करायची (Chef Kunal Kapur Paneer Afgani Recipe)...
साहित्य -
१. पनीर - ३०० ग्रॅम
२. मीठ - चवीनुसार
३. लिंबाचा रस - अर्धआ चमचा
४. आलं-लसूण पेस्ट - २ ते ३ चमचे
५. मिरच्या - ४
६. कांदा - १ मोठा
७. पुदीना - अर्धी वाटी
८. कोथिंबीर - १ वाटी
९. काजू- ८ ते १०
१०. चीज - १ चमचा
११. दही - १.५ वाटी
१२. साय - अर्धी वाटी
१३. कसुरी मेथी - अर्धा चमचा
१४. चाट मसाला - १ चमचा
१५. तेल - ४ चमचे
१६. बटर - १ चमचा
१७. तमालपत्र - १
१८. दालचिनी - १ तुकडा
१९. लवंग - ४ ते ५
कृती -
१. सुरुवातीला ३०० ग्रॅम पनीरचे मोठे तुकडे करुन घ्यायचे आणि त्यावर मीठ, लिंबू आणि आलं-लसूण पेस्ट लावून ठेवायची.
२. मग मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पाने, कोथिंबीर, काजू, आलं-लसूण, कांदा, मिरच्या आणि चीज असं सगळं एकत्र करुन मिक्सरवर बारीक करुन घ्यायचे. एकदा मिक्सर फिरवल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून बारीक पेस्ट तयार करायची.
३. एका मोठ्या ताटलीत थोडे फेटलेले दही, ताजी साय एकत्र करुन घ्यायचे. त्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेली हिरवी पेस्ट घालायची. यामध्ये मीठ, कसुरी मेथी आणि चाट मसाला घालून हे मिश्रण चांगले एकत्र करायचे.
४. यामध्ये मॅरीनेट केलेले पनीरचे तुकडे चांगले बुडवून घ्यायचे.
५. मग एका पॅनमध्ये तेल घालून हे पनीरचे तुकडे त्यावर चांगले खरपूस भाजून घ्यायचे. ते एका बाजूला ठेवून द्यायचे.
६. त्याच पॅनमध्ये तेल आणि बटर घालून त्यामध्ये तमालपत्र, लवंग आणि दालचिनी, हिरवी मिरची आणि आलं-लसूण पेस्ट घालायची.
७. त्यात पनीर मॅरीनेट केलेली पेस्ट घालून सगळे चांगले हलवायचे. यामध्ये फ्राय केलेले पनीर घालून वरुन छान हिरवीगार कोथिंबीर घालायची.