Join us  

ढेमश्याची भाजी मुलंं खात नाहीत? ट्राय करा मसालेदार चटणी, सोपी झटपट चवीलाही उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2022 4:38 PM

Squash Melon Chutney ढेमसे किंवा टिंडे नाव घेताच बहुतेक लोक नाक मुरडतात. ढेमश्याची भाजी तर खाल्ली असेलच, आता सालीपासून चटणी ट्राय करा.

ढेमसे किंवा टिंडे नाव घेताच बहुतेक लोक नाक मुरडतात. अनेकांना ही भाजी आवडत नाही. मात्र, या भाजीचे सेवन केल्याने अनेक फायदे आपल्या शरीरावर होतात. आयुर्वेदात ढेमसे याला टिंडे देखील म्हणतात. टिंड्यात फायबर, व्हिटॅमिन सी, लोह, कॅरोटीनॉइड्स, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे पोषक तत्व आहेत. जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. टिंड्याच्या भाजीचे सेवन केल्याने अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांशी निगडित दोन हात करायला मदत होते. आपण ढेमश्याची भाजी खाल्ली असेल, तर आता ढेमश्याच्या सालीपासून तयार चटणी ट्राय करा. सोपी आणि झटपट बनणारी ही चटणी पराठा, किंवा चपातीसह खूप चविष्ट लागते.

ढेमश्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य

ढेमश्याची सालं - १ कप

कोथिंबीर - अर्धा कप

चिरलेला एक मोठा टोमॅटो

लिंबू -१ 

काळे मीठ - चवीनुसार

आले - १ टेबलस्पून

हिंग

शेंगदाणे

तूप - १ टेबलस्पून

कृती

ढेमश्याच्या सालीची चटणी बनवण्यासाठी सर्व प्रथम कढईत तूप टाका. त्यात शेंगदाणे घालून चांगले तळून घ्या. यानंतर भाजलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून ठेवा.

ढेमश्याची साले पाण्यात नीट धुवून घ्या. मिक्सरमध्ये साले, कोथिंबीर, टोमॅटो, लिंबाचा रस आणि मीठ टाका. यासोबत हिंग, आले आणि तळलेले शेंगदाणे घालून बारीक करून घ्या.

बारीक करत असताना आवश्यकतेनुसार पाणी घालून पुन्हा बारीक करा. यानंतर, शेवटी चवीसाठी लिंबाचा रस घाला आणि चांगले मिसळा. हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे ढेमश्याच्या सालीची मसालेदार चटणी तयार आहे.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स