दूध हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. दुधात असणारे गुणधर्म शरीराला अनेक पोषक तत्वे देतात. दुधातील प्रथिने उच्च दर्जाची असल्यामुळे शरीराची वाढ, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर दुधात कॅल्शियम व डी जीवनसत्त्व असते. दुधामधील कॅल्शियमचा आपल्या हाडांना खूप फायदा होतो. दुधामध्ये लॅक्टोज नावाची साखर-कर्बोदके असतात. या साखरेमुळे दुधाला गोडवा येते. दूध पूर्णान्न असतं. मुख्यतः लहान मुलांनी दुधाचे सेवन अधिक केले पाहिजे. वाढत्या अंगासाठी यासह हाडांच्या मजबुतीसाठी लहान मुलांकरिता दुध महत्वाचे आहे. पण बहुतांश मुलं दुध पिण्यास टाळाटाळ करतात. त्यातील असणारे पोषक तत्वे त्यांच्या शरीराला योग्यरीत्या मिळत नाही. त्यामुळे मुलांच्या शरीरात विविध आजार उद्भवतात. आपली मुलं जर साधं दुध पिण्यास नकार देत असतील, तर आपण त्या दुधात पौष्टीक घटक मिसळून दुधाला चविष्ट बनवू शकता.
बदाम दुध
सर्वप्रथम, कोमट पाण्यात बदाम एक तास भिजत ठेवा. बदाम भिजल्यानंतर त्याची सालं काढून घ्या. भिजवलेल्या बदामाची चांगली पेस्ट तयार करून घ्या. एका भांड्यात दुध उकळवत ठेवा. दुधाला उकळी फुटल्यानंतर त्यात बदामाची पेस्ट टाका. आणि दुधाला चांगले ढवळत राहा. दुधाला घट्टपणा आल्यानंतर त्यात गुळ किंवा मध मिसळा, जेणेकरून दुधाला अधिक गोडवा येईल. अशाप्रकारे आपले बदामाचे दुध खास मुलांसाठी तयार.
वेलची फ्लेवर दुध
वेलची फ्लेवर दुध मुलं खुप आवडीने पितात. सर्वप्रथम, एका भांड्यात दोन वाट्या दूध उकळत ठेवा, त्यात तीन ते चार वेलची. ब्राऊन शुगर आणि केशर टाकून चांगली उकळी येऊ द्या. दुधाला चांगलं घट्टपणा येऊपर्यंत उकळत ठेवा. दुधाला घट्टपणा आल्यानंतर गॅस बंद करा. मुलांना गरमागरम दुध सर्व्ह करा. मुलांना या दुधाची चव खूप आवडेल आणि आनंदाने दुधाचा आस्वाद घेतील.
ड्रायफ्रुट्स दुध
ड्रायफ्रुट्स शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. मुलं जर ड्रायफ्रुट्स खाण्यास टाळाटाळ करत असतील, तर आपण त्यांना ड्रायफ्रुट्स दुध बनवून देऊ शकता. सर्वप्रथम, एका भांड्यात दुध घ्या त्यात आपल्या आवडीचे बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स आणि केसर टाका. दुधाला घट्टपणा आल्यानंतर गॅस बंद करा. आणि हे दुध आपल्या मुलांना प्यायला द्या. जर आपल्याला कच्चे ड्राईफ्रूट्स आवडत असतील तर दूध गरम होत असताना त्यात ड्राईफ्रूट्स टाकू नका. दूध गरम झाल्यानंतर टाका. अशाप्रकारे आपण या दुधाचे आस्वाद घेऊ शकता.