बालदिन जवळ आला की मुलांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. आपल्या वाढदिवसाची ज्याप्रकारे मुलं आतुरतेने वाट पाहत असतात त्याचप्रमाणे १४ नोव्हेंबरची देखील ते वाट पाहत असतात. यंदाचे बालदिन आपण आपल्या मुलांसाठी विशेष बनवू शकता. आपल्या पाल्यांसाठी विशेष प्लॅन बनवा, फिरायला घेऊन जा, यासह गोड पदार्थांमध्ये खास चॉकलेट फ्रूट कप बनवा. मुलांना चॉकलेट खूप आवडतात. चॉकलेटपासून बनवलेले पदार्थ मुलं लवकर फस्त देखील करतात. यासह त्यात विविध फळांचा देखील समावेश करा, जेणेकरून पोषक तत्वे त्यांच्या शरीराला मिळतील. यंदाचे बालदिन चॉकलेट फ्रूट कप बनवून साजरा करा. बनवायला सोपी आणि झटपट बनणारी ही रेसिपी कशी बनवायची पाहून घ्या.
चॉकलेट फ्रूट कप बनवण्यासाठी लागणारं साहित्य
डार्क चॉकलेट किंवा मुलांचे आवडते चॉकलेट
सफरचंद
द्राक्षे
किवी
काळी द्राक्षे
अननस
इतर आवडीचे फळ
व्हॅनिला इसेन्स
पिठीसाखर
फ्रेश क्रीम किंवा व्हीप्ड क्रीम
पुदिना
सिलिकॉन मोल्ड
कृती
सर्वप्रथम, डार्क चॉकलेट एका बाऊलमध्ये काढून घेणे. त्यानंतर चॉकलेट डबल बॉलिंगच्या पद्धतीने वितळून घेणे. त्यानंतर सामान्य खोलीच्या तापमानात चॉकलेट बाजूला काढून थंड होण्यासाठी ठेऊन देणे. बाजारात सिलिकॉन मोल्ड मिळतो. या साच्यांमध्ये वितळले चॉकलेट घालणे आणि फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेऊन द्यावे.
आता सर्व फळे कापून घ्या. द्राक्ष देखील अर्धी कापून घ्या. सफरचंद आणि किवीचे लहान तुकडे करा. अननसाचेही चौकोनी तुकडे करा. फळांचे काप झाल्यानंतर फ्रेश क्रीम घ्या, त्यात पिठीसाखर आणि व्हॅनिला इसेन्सचे काही थेंब टाकून फेटून घ्या. किंवा बाजारातून रेडीमेड व्हीप्ड क्रीम खरेदी करा. ती क्रीम पाइपिंग बॅगमध्ये भरून ठेवा.
फ्रीजरमधून मोल्ड काढा. या साच्यांमधून चॉकलेट बाहेर काढा. बाहेर काढल्यावर चाॅकलेट बाऊलच्या आकाराप्रमाणेच राहतील. पाईपिंग बॅगच्या मदतीने या चॉकलेटमध्ये क्रीम भरा. मग त्यावर सर्व फळे ठेवा. फळांच्या वर एक थर मलई लावा. शेवटी कपला चॉकलेट किंवा रंगीत टॉफीने सजवा आणि पुदिनाचे पान ठेवा. अश्याप्रकारे स्वादिष्ट चॉकलेटी फ्रूट कप तयार आहे..