ख्रिसमस म्हटलं की केक, चॉकलेटस, कुकीज, सांताक्लॉज आणि गिफ्टस हे सगळं आपसूकच आलं. आता केक म्हटलं की मैदा आलाच. पण लहान मूलं, आरोग्याच्या विविध समस्या असलेले घरातील ज्येष्ठ मंडळी यांच्यासाठी आणि सामान्यपणे इतरांसाठीही मैदा म्हणावा तितकी हेल्दी नसतो. त्यामुळे मैद्याचा केक खायचा म्हटला की विचार करुन मर्यादेतच खावा लागतो. पण केक हा सगळ्यांचाच वीक पॉईंट, त्यामुळे तो खाताना नियंत्रण ठेवणं अवघडच. अशावेळी घरच्या घरी ड्रायफ्रूटस घातलेला केक मैद्याविना करता आला तर? असा केक आपल्याला मनसोक्त खाता येईल आणि घरच्या घरी केल्यामुळे खिशालाही परवडेल. आता गव्हाच्या पीठाचा केक म्हणजे तो स्पॉँजी नसणार असा आपला समज होऊ शकतो. पण असं काही नाही. योग्य पद्धतीने केला तर हा केकही मैद्याच्या आणि रव्याच्या केक इतकाच छान लुसलुशीत होऊ शकतो. पाहूया घरच्या घरी गव्हाचे पीठ वापरुन केक कसा तयार करायचा...
साहित्य -
- अर्धा कप गूळ किंवा साखर
- पाऊण ते एक कप दूध
- पाव कप तेल
- जायफळ पावडर किंवा वेलची पावडर
- १ कप गव्हाचे पीठ
- अर्धा कप रवा
- १ चमचा खायचा सोडा
- चिमूटभर मीठ
- पाव कप अक्रोड
- पाव कप काजूचे तुकडे
- पाव कप बदाम काप
कृती
१. कुकरची शिट्टी आणि रींग काढून १० मिनिटे कुकर गॅसवर ठेऊन गरम करुन घ्यायचा.
२. गूळ किंवा साखर, दूध आणि तेल एकत्र करुन मिक्सरमधून फिरवून घ्यायचे. गुळाचे तुकडे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची.
३. मिक्सरमध्ये राहीलेले मिश्रण पुन्हा थोडे दूध घालून फिरवून घ्यायचे.
४. हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यामध्ये जायफळ किसून घालावे, जायफळ ऐवजी वेलची आवडत असेल तर वेलचीचाही चांगला स्वाद येतो.
५. गव्हाचे पीठ, एक चमचा सोडा आणि चवीपुरते मीठ चाळणीमध्ये एकत्र करुन ते चाळून घ्यायचे आणि वरील मिश्रणात एकत्र करायचे. यामध्ये रवाही घालायचा.
६. मिश्रण एकजीव करायचे, जास्त घट्ट वाटल्यास थोडेसे दूध घालायचे.
७. सुकामेव्याचे बारीक काप करुन ते यामध्ये घालावे.
८. अल्युमिनिअमचे भांडे घेऊन त्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचे.
९. एकजीव केलेले मिश्रण या भांड्यात घालून भांडे व्यवस्थित हलवावे
१०. सजावटीसाठी पुन्हा वरती ड्रायफ्रूट, टुटीफ्रुटी आणि आणखी काही घालायचे असेल तर घालावे.
११. प्रिहीट केलेल्या कुकरमध्ये खाली एक भांडे, त्यावर जाळी आणि त्यावर कुकरचे भांडे ठेवायचे. जवळपास १५ मिनीटे कुकर गॅसवर ठेवायचा.
१२. केक बाहेर काढल्यानंतर भांडे पूर्ण गार झाल्यानंतर केकमध्ये सुरी किंवा चमचा घालून पाहायचा, त्याला काहीही चिकटले नाही तर केक व्यवस्थित बेक झाला असे समजायचे