Join us  

ख्रिसमस स्पेशल : ओव्हन नको, मैदा नको घरी बनवा बेकरीसारखे परफेक्ट कुकीज, घ्या सोपी रेसिपी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2023 3:51 PM

Christmas Special Home made Cookies : कणकेपासून तेही ओव्हन न वापरता बाजारातल्या कुकीजपेक्षा जास्त छान लागणारे हे कुकीज कसे करायचे पाहूया...

कुकीज किंवा नानकटाई म्हटली की आपल्याला आठवते ती बेकरी. बेकरीमध्ये तयार केल्या जाणाऱ्या या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात  बेकींग सोडा, बेकींग पावडर, मैदा यांचा वापर केलेला असतो. त्यामुळे हे आरोग्यासाठी चांगले नसते असे आपण वारंवार ऐकतो. ख्रिसमसच्या निमित्ताने केक, कुकीज यांसारख्या गोष्टींनी बाजारपेठा सजलेल्या असतात. अशावेळी आपल्यालाही हे पदार्थ खाण्याचा मोह होतो. पण खूप जास्त महाग मिळणारे हे पदार्थ बाहेरुन आणण्यापेक्षा घरीच केले तर. पाहूयात कणकेपासून तेही ओव्हन न वापरता बाजारातल्या कुकीजपेक्षा जास्त छान लागणारे हे कुकीज घरच्या घरी कसे तयार करायचे (Christmas Special Home made Cookies)... 

साहित्य - 

१. कणीक - २ वाटी

२. बारीक रवा - अर्धी वाटी 

३. खोबऱ्याचा बारीक कीस - अर्धी वाटी 

(Image : Google)

४. मीठ - चवीनुसार 

५. साखर - १ वाटी

६. वेलची पावडर - अर्धा चमचा 

७. सुकामेवा - आवडीनुसार 

८. तूप - २ ते ३ वाट्या

कृती -

१. एका भांड्यात कणीक, रवा, खोबऱ्याचा किस, मीठ, वेलची पावडर आणि सुकामेवा एकत्र करुन घ्यायचा.

२. दुसऱ्या एका बाऊलमध्ये साखर घालून ती बुडेल इतकेच पाणी घालून ते भिजत ठेवायचे.

३. पीठ एकत्र केलेल्या भांड्यात तूप घालून हे पीठ हाताने एकजीव करुन घ्यायचे.

४. मग यामध्ये साखर आणि पाण्याचे मिश्रण घालायचे आणि सगळे पीठ हळूहळू पुन्हा एकजीव करायचे. 

५. मग या पिठाच्या लाटून, हाताने थापून किंवा मोल्डने आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या कुकीज करायच्या.

६. आता एका कढईमध्ये तूप घेऊन त्यामध्ये हे तयार केलेले कुकीज अतिशय हलक्या हाताने बारीक गॅसवर तळून घ्यायचे. 

७. थोड्या वेळाने गॅस मध्यम करावा. साखर असल्याने तसेच पीठ जास्त घट्टसर न मळल्याने हे कुकीज अतिशय छान होतात. 

८. गरम असतानाच यावर सुकामेव्याचे काप किंवा बारीक खोबरे घालायला हवे. 

टॅग्स :अन्ननाताळपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.