वाटी केक हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा प्रकार. कधी चहासोबत तर कधी नुसताच खायला हा वाटी केक अनेकांना आवडतो. वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिळणाऱ्या या केकला ख्रिसमसच्या दिवसांत तर विशेष मागणी असते. आता हा केक करायला ओव्हन लागतो, विशिष्ट आकाराचे मोल्ड लागतात असा आपला समज असतो. पण अगदी घरच्या घरी कुकरमध्ये आणि चक्क वाटीमध्ये आपण हे वाटी केक बनवू शकतो. ख्रिसमसच्या काळात मुलांना चॉकलेट, व्हॅनिला किंवा आणखी कोणत्या फ्लेवरचे केक दिल्यास मुलं तर खूश होतीलच पण असा केक आपण घरी बनवला म्हणून आपल्याला होणारा आनंदही वेगळाच असेल. आता हे केक बनवण्यासाठी नेमकं काय काय सामान लागतं आणि ते कसे बनवायचे याविषयी समजून घेऊया (Christmas Special Home Made Cup Cake Recipe).
साहित्य -
१. बटर - १०० ग्रॅम
२. मैदा - १.५ वाटी
३. पिठीसाखर - अर्धी वाटी
४. मिल्क पावडर - अर्धी वाटी
५. दूध - अर्धी वाटी
६. सोडा - अर्धा चमचा
७. बेकींग पावडर - अर्धा चमचा
८. व्हॅनिला इसेन्स - पाव ते अर्धा चमचा
९. मगज बी - पाव वाटी
कृती -
१. कुकरमध्ये मीठ किंवा बेकींग सोडा घालून त्यामध्ये एक भांडे ठेवून तो मध्यम आचेवर प्रिहीट करण्यासाठी ठेवून द्या.
२. बटर मऊ हवे, त्यासाठी २ ते ३ तास बटर बाहेर काढून ठेवायला हवे.
३. त्यामध्ये पिठीसाखर घालून ते चांगले एकजीव करुन घ्यायचे.
४. मग यामध्ये मिल्क पावडर घालून नंतर हळूहळू दूध घालून हे मिश्रण पुन्हा एकजीव करायचे. मग यात व्हॅनिला इसेन्स घालायचा.
५. एका चाळणीत मैदा घालून त्यामध्येच सोडा आणि बेकींग पावडर घालून ते या बॅटरमध्ये चाळून घ्यायचे आणि सगळे पुन्हा चांगले एकजीव करुन घ्यायचे.
६. घरात असणाऱ्या वाट्यांना तेल लावून त्यामध्ये अर्धी वाटी भरेल इतके हे बॅटर घालून त्यावर सजावटीसाठी मगज बी, सुकामेवा असे काहीही घालू शकतो. वाट्या चांगल्या टॅप करुन घ्यायच्या जेणेकरुन त्यामध्ये हवा राहणार नाही.
७. प्रिहीट केलेल्या कुकरमध्ये भांड्यावर एक ताटली ठेवून त्यावर या वाट्या ठेवायच्या आणि रींग आणि शिट्टी काढून झापण लावून १५ ते २० मिनीटे हे चांगले होऊ द्यायचे.
८. गॅस बंद केल्यावर कुकर १० मिनीटे तसाच गार होण्यासाठी ठेवायचा.
९. त्यानंतर वाट्या बाहेर काढून हळूहळू हा केक वाटीतून काढायचा.
१०. आवडीनुसार यामध्ये आपण चॉकलेट फ्लेवर, ड्रायफ्रूटस, टूटीफ्रूटी असे काही ना काही घालू शकतो.