ख्रिसमस हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. प्रत्येकाकडे नाताळ या सणाची लगबग सुरु आहे. हा सण लहानमुलांचा आवडता सण आहे. कारण या सणानिमित्त लहानग्यांना गिफ्ट्स, चॉकलेट्स, केक्स, कुकीज मिळतात. बहुतांश वेळा आपल्याला कुकीज खाण्याची इच्छा होते. मात्र, घरी सामान नसल्यामुळे कुकीज बनवायचे कसे हा प्रश्न पडतो. अशावेळी आपण बिस्किट्सपासून कुकीज बनवू शकता. ही झटपट क्रंची रेसिपी आपल्याला व आपल्या मुलांना नक्की आवडेल. चला तर मग या पदार्थाची कृती जाणून घेऊया.
नो बेक चॉकलेट कुकीज बनवण्यासाठी लागणारं साहित्य
मारी बिस्किट्स
पिठीसाखर
कोको पावडर
बटर
दुध
वितळलेले डार्क चॉकलेट
कृती
सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात मारी बिस्किट्स घ्या. त्यानंतर मारी बिस्किट्स बारीक क्रश करून घ्या. बिस्किट्सचे हे क्रश एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यात पिठी साखर, कोको पावडर, टाकून मिश्रण एकत्र मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात वितळलेले बटर टाकून पुन्हा मिश्रण चांगले एकजीव करा.
संपूर्ण मिश्रण चांगले मिक्स झाले की त्यात दुध टाका. आणि चपातीचे पीठ आपण ज्यारीत्या मळतो, त्याचप्रमाणे पीठ मळून घ्या. शेवटी एक बटर पेपर घ्या त्या बटर पेपरमध्ये हे मिश्रण गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवा.
मिश्रण घट्ट झाल्यानंतर बाहेर काढा आणि बारीक गोलाकार काप करा. कुकीजचे काप झाल्यानंतर त्याला वितळलेलल्या डार्क चॉकलेटमध्ये कोट करा. सजावटीसाठी आपण त्यावर रंगीबेरंगी चॉकलेट अथवा क्रश चॉकलेट टाकून सजवू शकता. अशाप्रकारे आपले नो बेक चॉकलेट कुकीज खायला रेडी.