ख्रिसमस म्हटला की आपल्याला सगळ्यात आधी आठवतो तो केक, सांताक्लॉज आणि गिफ्टस. प्रत्येक सणाची अशी एक खासियत असते तशी ख्रिसमसची खासियत म्हणजे बेकरीमध्ये केले जाणारे पदार्थ. पण हे पदार्थ एकतर महाग असतात आणि मैद्याचे असल्याने आपण लहान मुलांना ते जास्त प्रमाणात देत नाही. ख्रिसमस काही दिवसांवर आलेला असताना बाहेरचे महागडे केक आणण्यापेक्षा घरीच केक केला तर? मैदा न वापरता रव्यापासून अगदी विकतसारखा मऊ-स्पाँजी केक करता येऊ शकतो. विशेष म्हणजे यासाठी तुमच्याकडे ओव्हन असायलाच हवा असं काही नाही. तर घरात असलेल्या कुकरमध्ये किंवा अगदी कढईतही हा केक खूप छान होतो. कमीत कमी पदार्थांत आणि वेळात होणारा हा केक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. पाहूयात हा रवा केक कसा करायचा (Christmas Special Rava cake Recipe) ...
साहित्य -
१. बारीक रवा - २ वाटी
२. ताजे दही - १ वाटी
३. पिठीसाखर - १ वाटी
४. दूध - १ वाटी
५. तूप - पाव वाटी
६. व्हॅनिला इसेन्स - अर्धा चमचा
७. ड्रायफ्रूट आणि टूटीफ्रूटी - आवडीनुसार
८. बेकिंग पावडर - १ चमचा
९. बेकिंग सोडा - १ चमचा
कृती -
१. एका बाऊलमध्ये तूप घालून त्यामध्ये साखर घालून ते दोन्ही चांगले एकजीव फेटून घ्यायचे.
२. यामध्ये रवा आणि दही घालून पुन्हा हे सगळे एकजीव करुन घ्यायचे.
३. मग यात दूध आणि व्हॅनिला इसेन्स घालून हे मिश्रण पुन्हा एकजीव करावे आणि झाकण ठेवून हे मिश्रण अर्धा तास बाजूला ठेवावे.
४. जाड बुडाच्या कढईमध्ये मीठ किंवा बेकिंग सोडा घालून त्यावर डीश ठेवून केकचे भांडे घालून कढई १० मिनीटे प्री हीट करुन घ्यायची.
५. बाजूला ठेवलेल्या मिश्रणात बेकींग सोडा आणि बेकींग पावडर घालून मिश्रण पुन्हा एकजीव करावे.
६. आवडीनुसार यामध्ये सुकामेवा आणि टूटीफ्रूटी घालावी.
७. कुकरच्या भांड्याला तेल किंवा तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण घालायचे.
८. गॅस सुरू करुन प्रीहीट झालेल्या कढईमध्ये ३५ ते ४० मिनीटे हे भांडे ठेवायचे आणि वरुन झाकण ठेवायचे.
९. गॅस बंद केल्यावर केक गार होऊ द्यायचा, त्यानंतर कडेनी मोकळा करायचा.