Join us  

गणपती बाप्पासाठी करा खास चुरमा लाडू, तोंडात टाकताच विरघळणारा पारंपरिक नैवैद्य, सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2023 12:14 PM

Churma Ladoo Easy Recipe Ganpati Festival Special : पौष्टीक आणि चविष्ट चुरमा लाडू यंदाच्या गणपतीत नक्की ट्राय करा...

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी रोज सकाळ-संध्याकाळ काही ना काही लागतंच. सारखे मोदक किंवा खव्याचे बर्फी-पेढे खाऊन कंटाळा आला असेल तर घरच्या घरी अगदी झटपट होणारे चुरमा लाडू तुम्ही नक्की ट्राय करु शकता. पारंपरिक राजस्थानी आणि गुजराती लोकांकडे केले जाणारे हे लाडू तोंडात टाकताच विरघळणारे असल्याने अतिशय चविष्ट लागतात. तसेच गव्हाचे पीठ आणि गूळ यांचा वापर केलेला असल्याने अगदी लहान मुलांपासून ते डायबिटीस असणाऱ्यांपर्यंत सगळेच या गोड पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात. पौष्टीक असलेले चुरमा लाडू घरी करण्यासाठी नेमके कोणते जिन्नस वापरायचे आणि हे लाडू कसे करायचे पाहूया (Churma Ladoo Easy Recipe Ganpati Festival Special)...

साहित्य -

१. गव्हाचे पीठ - २ वाट्या 

२. साजूक तूप - १ वाटी 

३. गूळ - १ वाटी 

(Image : Google)

४. वेलची पावडर - अर्धा चमचा 

५. सुकामेव्याचे काप - आवडीनुसार 

कृतr- 

१. सगळ्यात आधी गव्हाचे पीठ घेऊन त्यात साधारण पाव वाटी तूपाचे मोहन घालायचे आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचे.

२. या पीठाचे हाताने दाबून गोळे करुन घ्यायचे आणि हे गोळे तूपातून तळून घ्यायचे. 

३. थोडे गार झाले की या गोळ्यांचे तुकडे करुन ते मिक्सरमधून बारीक करुन घ्यायचे. 

४. एका चाळणीने चाळून घेऊन या चुरम्याचा बारीक भाग वेगळा करायचा. 

५. गोळे तळलेल्या तूपातच गूळ घालून तो चांगला पातळ करुन घ्यायचा आणि त्यात वेलची पावडर घालायची. 

६. हा गूळ गरम असतानाच चुरम्यामध्ये घालायचा आणि डावाने सगळे मिश्रण एकजीव करायचे. 

७. आवश्यकतेनुसार थोडे तूप घालून मिश्रण एकजीव करुन गोलाकार लाडू वळायचे. 

८. लाडूच्या वर काजू, पिस्ता, बदाम यांचे काप लावून लाडूला सजवायचे. 

९. कमीत कमी पदार्थांमध्ये आणि झटपट होणारे हे लाडू अतिशय चविष्ट लागतात.  

टॅग्स :गणेशोत्सवपाककृतीअन्नगणपतीगणेशोत्सव