Lokmat Sakhi >Food > हिरव्यागार चिंचेचा चटकमटक ठेचा! तिखट-आंबटगोड चवीची ही घ्या रसरशीत रेसिपी, तोंडाला पाणीच सुटेल..

हिरव्यागार चिंचेचा चटकमटक ठेचा! तिखट-आंबटगोड चवीची ही घ्या रसरशीत रेसिपी, तोंडाला पाणीच सुटेल..

सध्या हिरव्या चिंचेचा सिझन आहे. छान गाभूळलेल्या आंबटगोड चिंचा म्हणजे आहाहा.... हिरव्यागार चिंचेचा रसरशीत ठेचा... ठेचा बनविण्याची अशी ही घ्या अस्सल मराठवाडी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2021 12:13 PM2021-11-14T12:13:26+5:302021-11-14T14:50:35+5:30

सध्या हिरव्या चिंचेचा सिझन आहे. छान गाभूळलेल्या आंबटगोड चिंचा म्हणजे आहाहा.... हिरव्यागार चिंचेचा रसरशीत ठेचा... ठेचा बनविण्याची अशी ही घ्या अस्सल मराठवाडी रेसिपी...

The chutney of green tamarind! Take this delicious recipe with spicy and sour taste... | हिरव्यागार चिंचेचा चटकमटक ठेचा! तिखट-आंबटगोड चवीची ही घ्या रसरशीत रेसिपी, तोंडाला पाणीच सुटेल..

हिरव्यागार चिंचेचा चटकमटक ठेचा! तिखट-आंबटगोड चवीची ही घ्या रसरशीत रेसिपी, तोंडाला पाणीच सुटेल..

Highlightsदिवाळीचा फराळ अजीर्ण झाला असेल, तर हा चिंचेचा ठेचा त्यासाठी चांगला उतारा ठरू शकताे. कारण हिरव्या चिंचेमुळे पोट साफ होते. तसेच ॲसिडिटीचा त्रास कमी होतो.

चिंचेचं नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. मग याच चिंचेचा ठेचा केला तर तो काय जबरदस्त होईल, याचा नुसता विचार करा आणि ही चटकमटक, झणझणीत रेसिपी करण्याच्या तयारीला लागा. दिवाळीच्या आसपास हिरव्यागार चिंचांचा जबरदस्त सिझन सुरू हाेतो. बऱ्याचदा दिवाळीच्या सुट्ट्यात आपण कुठे बाहेरगावी जाण्याचा प्लॅन आखतो आणि गाडी थोडी गावाबाहेर गेली की गाभूळलेल्या चिंचांनी लगडलेली झाडं दिसू लागतात. हिरव्या गार चिंचा मीठ लावून खाण्याचा आनंद तर वेगळाच. पण दात लगेचच आंबत असल्याने अशा कच्च्या चिंचा आपण खूप खाऊ शकत नाही. म्हणूनच तर चिंचा खाण्याचा आनंदही मिळावा आणि चवीत थोडा बदलही व्हावा म्हणून करून बघा हिरव्या चिंचेचा हा चटकमटक ठेचा.. असा झकास ठेचा तयार होतो की तोंडाला चवच येते.

 

हिरव्या चिंचेचा ठेसा बनविण्यासाठी लागणारे साहित्य
हिरव्यागार चिंचा, (गाभूळलेल्या म्हणजेच थोड्या चॉकलेटी होऊन पिकलेल्या चिंचा या रेसिपीसाठी वापरू नयेत. अगदी हिरव्यागार चिंचा वापराव्या), हिरव्या मिरच्या, जिरे, गूळ, मीठ आणि फोडणीसाठी तेल, हिंग व मोहरी.

कसा बनवायचा चिंचेचा ठेचा
- हिरव्या चिंचेचा ठेचा बनविण्यासाठी सगळ्यात आधी हिरव्या चिंचा आणि हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्या.
- धुतल्यानंतर चिंचा आणि मिरच्या दोन्ही चांगल्या प्रकारे सुकू द्या. कारण यात जर पाणी राहिले, तर ठेचा लवकर खराब होऊ शकतो.
- यानंतर जेवढ्या हिरव्या चिंचा घेतल्या असतील तेवढ्याचा प्रमाणात हिरव्या मिरच्या घ्या. ठेचा छान झणझणीत होण्यासाठी हिरव्या मिरच्या आणि हिरव्या चिंचा यांचं प्रमाण सारखं हवं.


- मिरच्या आणि चिंचा यांचे प्रत्येकी एक- एक वाटी भरून लहान- लहान तुकडे करून घ्या.
- मिरच्या, चिंचा, अर्धी वाटी गुळ, जिरे आणि चवीनुसार मीठ हे सगळे साहित्य एकत्र मिक्सरमध्ये एकत्र टाकून फिरवून घ्या.
- यानंतर हा ठेचा एका बाऊलमध्ये काढा.
- कढईत फोडणी करण्यासाठी तेल गरम करा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडली की थोडासा हिंग टाका.
- तयार केलेल्या ठेच्यामध्ये ही फोडणी वरतून घाला.
- पाेळी, भाकरी, थालपीट, धपाटे यांच्यासोबत तोंडी लावायला हा ठेचा खूपच छान लागतो.
- जेवणात जशी तुम्ही चटणी घेता तसा चटणीप्रमाणे तोंडी लावायला ठेचा खाऊ शकता.
- व्यवस्थित घट्ट झाकण असलेल्या काचेच्या बरणीत हा ठेचा भरून फ्रिजमध्ये ठेवला तर तो ८ दिवस तरी चांगला टिकतो. त्यामुळे करताना खूप जास्त ठेचा करू नका. जास्तीतजास्त ८ दिवस खाता येईल या हिशोबानेच करा.

 

हिरवी चिंच खाण्याचे आरोग्यदायी फायदे
१. चिंचेमध्ये फायबर, टार्टेरिक ॲसिड, पोटॅशियम हे घटक मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे हिरवी चिंच खाल्ल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास फायदा होतो.
२. दिवाळीचा फराळ अजीर्ण झाला असेल, तर हा चिंचेचा ठेचा त्यासाठी चांगला उतारा ठरू शकताे. कारण हिरव्या चिंचेमुळे पोट साफ होते. तसेच ॲसिडिटीचा त्रास कमी होतो.
३. हा ठेचा बनविताना आपण त्यात मोठ्या प्रमाणात गुळ घालतो. गुळ असल्यामुळे शरीरातील लोह पातळी वाढविण्यास हा ठेचा उपयुक्त ठरतो.


४. हिरव्या चिंचेच्या सेवनामुळे केसांचे आरोग्य सुधारते. केस मजबूत आणि लांब होण्यास मदत होते.
५. मज्जासंस्थेचे कार्य सुधारण्यासाठी आणि हृदयाचे कार्य नियंत्रित ठेवण्यासाठी हिरवी चिंच खाणे उपयुक्त ठरते.
६. मधुमेहींसाठी देखील हिरवी चिंच उपयुक्त आहे. शिवाय या ठेच्यात आपण गुळ टाकत असल्याने मधुमेह असणारे लोकही या चिंंचेच्या ठेच्याचा आस्वाद घेऊ शकतात. 

 

Web Title: The chutney of green tamarind! Take this delicious recipe with spicy and sour taste...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.