Join us  

कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवायचं तर आवर्जून खा १ खास चटणी ; घ्या सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2023 1:27 PM

Chutney Recipe For Cholesterol Control : घरच्या घरी सहज करता येईल अशी फायदेशीर रेसिपी...

ठळक मुद्देआहारात काही किमान बदल केल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते...आपल्या किचनमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे पदार्थ असतात, आपल्याला त्याबाबत पुरेशी माहिती असायला हवी...

कोलेस्टेरॉल ही अशी समस्या आहे की ज्यामुळे हृदयाच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढली की हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये एकप्रकारचा थर जमा होतो आणि त्यांना रक्तपुरवठा तसेच ऑक्सिजन न मिळाल्याने हृदयाच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्याचे आपल्याला कळत नाही. म्हणूनच वयाच्या चाळीशीनंतर आपण स्वत:हून नियमितपणे काही तपासण्या करायला हव्यात. व्यायामाचा अभाव, चुकीची आहारपद्धती, ताणतणाव यांमुळे कोलेस्टेरॉलची समस्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. मात्र हेच कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आज आपण एक खास रेसिपी पाहणार आहोत. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी ही रेसिपी सांगितली असून ती कशी करायची आणि त्याचे काय फायदे होतात याविषयी जाणून घेऊया (Chutney Recipe For Cholesterol Control)...

साहित्य -

१. कोथिंबीर - ५० ग्रॅम

२. पुदिना - २० ग्रॅम

(Image : Google)

३. हिरवी मिरची - १ ते २

४. लसूण - ६ ते ७ पाकळ्या 

५. इसाबगोल - १५ ग्रॅम

६. जवसाचं तेल - ३ चमचे 

७. मीठ - चवीनुसार 

८. लिंबाचा रस - २ चमचे 

कृती -

१. यातील सगळे पदार्थ स्वच्छ करुन मिक्सरच्या भांड्यात एकत्र करायचे.

२. मिक्सर फिरवून त्याची बारीक चटणी तयार करायची. 

३. आवश्यकतेनुसार पाणी घालून चटणी एकजीव करायची. 

फायदे -

१. आपल्या घरात नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये कोथिंबीर आणि पुदीना असतोच. यामध्ये क्लोरोफील आणि फायबरचे प्रमाणा जास्त असते. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी हा घटक उपयुक्त ठरतो. 

२. रक्त पातळ करण्यासाठी आणि रक्तवाहिन्या आकुंटन पावण्यासाठी लसणाचा चांगला उपयोग होतो. यामुळे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

३. इसाबगोल कोठा साफ करण्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तो दूर होण्यास याचा चांगला उपयोग होतो. पचनक्रिया आणि कोलेस्टेरॉलसाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी इसाबगोल फायदेशीर असल्याने या चटणीमध्ये त्याचा आवर्जून वापर करायला हवा. 

४. जवसामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. त्याचाही कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड नियंत्रणात राहण्यासाठी फायदा होतो. ज्यांना डायबिटीस आहे अशांसाठी तर ओमेगा ३ अतिशय फायदेशीर असते, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

टॅग्स :अन्नआरोग्यपाककृतीहेल्थ टिप्स