Join us  

कोथिंबीरला द्यावा 'नॅशनल हर्ब'चा दर्जा.. शेफ रणवीर ब्रारची मागणी ऐकून लोकं म्हणाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 8:09 PM

कोथिंबीरची स्वयंपाकघरातील उपयुक्तता वादातीत आहे. म्हणूनच तर शेफ रणबीर ब्रारनं  मुद्दा काढताच त्यावर सहमतीची लाट उसळली. 

ठळक मुद्देदेशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा पदार्थात कोथिंबीर असतेच. कोथिंबीरचे पदार्थ आवडीने खाणारे खवय्ये आहेत  तसेच कोथिंबीरचे गार- गरम पेयही आवडीने पिणारे चाहतेही आहेत. 

शेफ रणबीर ब्रारने समाज माध्यमांवर काही पोस्ट टाकली रे टाकली की त्यावर लाइक्स आणि कमेण्टसचा पाऊस पडतो. इन्स्टाग्रामवर रणवीरने  एका फोटो स्टोरी टाकली. त्याची  चर्चा समाजमाध्यमांवर जोरात सुरु आहे. यात बोलणारे रणवीरच्या विरुध्द नाही तर त्याच्या बाजूने बोलत आहेत. रणवीरनं इन्स्टाग्रामवर एक फोटो स्टोरी शेअर करुन एक मागणी केली आहे. रणवीरने आपल्या पोस्टमधून कोथिंबीरला राष्ट्रीय दर्जा मिळावा अशी मागणी केली आहे. रणवीर म्हणतो 'पिटीशन टू मेक धनिया द नॅशनल हर्ब'. रणवीरनं हे इन्स्टाग्रामवर टाकताच रणवीरच्या मताशी आपण सहमत असल्याच्या कमेण्टस पोस्टवर येऊ लागल्या. एकाच्या मते रणवीरनं अगदी योग्य मुद्दा मांडला आहे. तर एकानं 'सही कुठे करावी लागेल?' असा प्रश्न विचारला. केवळ सामान्य लोकच नाही तर स्टार शेफ देखील रणवीरच्या कोथिंबीरसंबंधीच्या मागणीशी सहमत आहे.

Image: Google

रोजच्या स्वयंपाकात कोथिंबीरही लागतेच. मग ती पोहे, उपमा यावर वरुन भूरभूरण्यासाठी असू देत किंवा मसाल्याच्या भाजीची मसाला बनवण्यासाठी. चहासोबतच्या कोथिंबीरच्या वड्यांसाठी ते रात्रीच्या जेवणात भाकरीसोबत कोथिंबीरची पीठ पेरुन भाजी करण्यासाठी कोथिंबीर लागतेच. कोथिंबीर महागली की ती घेता न आल्याने हळहळणारे जीव बाजारात कोथिंबीर स्वस्त होताच कोथिंबीरचे थालिपीठं, कोथिंबीरचं पिठलं यात मनमुराद कोथिंबीर वापरुन कोथिंबीरच्या ताज्या उत्साहवर्धक स्वादाचा आणि ताज्या हिरव्या रंगाचा आनंद आणि आस्वाद घेतात.  वरुन कोथिंबीर पेरली की त्या पदार्थाल चव आणि रुप येतं हा विश्वास असल्यानं अनेकजणी तर 100 रुपये जुडी या भावात मिळणारी कोथिंबीरही जीवनावश्यक म्हणून विकत आणतात. 

Image: Google

भारतात नवपाषाणयुगापासून म्हणजेच शेकडो वर्षांपासून कोथिंबीरचा वापर स्वयंपाकात केला जातो. देशभरात कोणत्याही दिशेच्या टोकाला जा पदार्थात विविधता असते पण त्या पदार्थांचे रुप आणि स्वाद वाढवण्यासाठी कोथिंबीर वापरलेलीच असते. खास कोथिंबीरच्या वड्या, थालिपिठं महाराष्ट्रात लोकप्रिय तर काश्मिरमध्ये कोथिंबीरचा शोरबा प्रसिध्द . दक्षिण भारतातला कोथिंबीरचा राइस इतका लोकप्रिय झाला की उत्तर प्रदेशात खास कोथिंबीरचा पुलाव केला जाऊ लागला.

Image: Google

नाश्त्याला- जेवणात कोथिंबीरचे पदार्थ  चव वाढव्ण्यासाठी केले जातात तर आजारपणात तोंडाला चव येण्यासाठी कोथिंबीरचं सूप प्यालं जातं. विविध शेफने कोथिंबीरपासून तयार होणाऱ्या पेयांचा शोध लावून कोथिंबीर खाण्यासोबतच पेयांमध्येही लोकप्रिय केली आहे. उन्हाळ्यात उन्हाच्या काहिलीपासून सुटका देणारे क्युकम्बर सिलॅन्ट्रो हे पेयं म्हणूनच आवडीनं प्यालं जातं. 

Image: Google

कोथिंबीरच्या धणे रुपातल्या बियांपासून ते कोथिंबीरच्या देठापर्यंत प्रत्येक गोष्टीचा उपयोग स्वादासाठी आणि आरोग्यासाठी केला जातो.  कोथिंबीर ही फक्त भारतातील स्वयंपाकघरातच नाही तर आयुर्वेदात औषधांमध्येही केला जातो. पोषण तज्ज्ञ स्वाती गर्ग म्हणतात की कोथिंबीरमध्ये ॲण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण भरपूर असतं. कोलेस्टेराॅल नियंत्रणात ठेवण्यासाठी कोथिंबीर आहारात आवश्यक असते. मधुमेहावर, झोपेशी निगडित समस्यांवर कोथिंबीरचा उपयोग पारंपरिक औषधं म्हणून केला जातो. 

Image: Google

कोथिंबीर ही स्वादिष्ट आणि औषधी वनस्पती कुठेही सहज उगवता येते. परसबाग, अंगणातल्या मनमोकळ्या जागेत कोथिंबीर  जशी बहरते तशीच ती स्वयंपाकघरातल्या छोट्याशा कुंडीतही सहज येते. कोथिंबीरच्या या गुणधर्मांमुळेच शेफ रणवीर ब्रानं कोथिंबीरला राष्ट्रीय वनस्पतीचा दर्जा देण्याची मागणी  केली असून या मागणीला  देशभरातून दुजोरा मिळत आहे. 

टॅग्स :अन्न