दिवाळी म्हटली की घरोघरी फराळाचे वास यायला लागतात. जास्त काही नाही तरी फराळाचे ४ पदार्थ तरी प्रत्येकाकडे आवर्जून केले जातात. लाडू हा त्यातलाच एक महत्त्वाचा पदार्थ. पण हल्ली अनेकांना गोड खायचे नसल्याने लाडूमध्ये गूळ घालणे नाहीतर लहान आकाराचे किंवा कमी प्रमाणात लाडू करण्याचे प्रमाण वाढले आहे. बरेचदा फराळाचे ताट दिले की कितीही आवडत असला तरी लठ्ठपणा नाहीतर डायबिटीस यांमुळे अर्धा किंवा त्याहूनही कमीच लाडू खाल्ला जातो. पूर्वी फक्त दिवाळीलाच फराळाचे पदार्थ केले जायचे पण आता मात्र वर्षभर चिवडा, लाडू, चकली हे पदार्थ उपलब्ध असल्याने लाडवांचेही विशेष महत्त्व राहीले नाही. लाडूमध्येही आपण रवा बेसनाचे, फक्त बेसनाचे किंवा नारळी पाकातले लाडू करतो. त्यापेक्षा यंदा नारळाची पांढरीशुभ्र वडी केली तर? अगदी कमीत कमी जिन्नस वापरुन झटपट होणारी ही वडी खायलाही सोपी आणि जिभेवर ठेवली की विरघळते. पाहूयात ही नारळाची वडी नेमकी कशी करायची (Coconut Barfi Khobra Barfi Recipe for Diwali).
१. सगळ्यात आधी नारळ फोडून त्याच्या खोबऱ्याच्या वाट्या काढून घ्यायच्या.
२. सालकाढी किंवा सुरीने वाट्यांच्या वर असलेला चॉकलेटी भाग काढून टाकायचा.
३. या राहिलेल्या पांढऱ्या खोबऱ्याचे लहान तुकडे करुन त्याचा मिक्सरवर बारीक किस करुन घ्यायचा.
४. पॅनमध्ये ३ वाटी खोबऱ्याचा किस घालून त्यातील मॉईश्चर जाईपर्यंत तो चांगला परतून घ्यायचा.
५. हे खोबरे थोडे कोरडे झाल्यावर त्यामध्ये अर्धी वाटी ताजी साय आणि अर्धी वाटी दूध घालून हे सगळे पुन्हा चांगले एकजीव करुन घ्यायचे.
६. यामध्ये साधारण १.५ वाटी साखर घालून हे सगळे पुन्हा एकजीव करुन परतून घ्यायचे.
७. थोडे कोरडे आणि चिकट होईपर्यंत हे पॅनमध्ये चांगले परतायचे आणि मग गॅस बंद करायचा.
८. एका मोठ्या ताटाला थोडे तूप लावून त्यावर हे खोबरं आणि साखरेचे परतलेले मिश्रण घालून एकसारखे पसरायचे.
९. एकसारखे घट्टसर दाबून हे मिश्रण १ ते १.५ तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवायचे.
१०. त्यानंतर सुरीने याला उभे आणि आडवे काप देऊन याच्या एकसारख्या वड्या पाडायच्या.
११. आवडीनुसार यावर बदाम आणि पिस्त्याचे काप लावायचे आणि वड्या एका आडव्या डब्यात ठेवायच्या.
१२. दूध आणि साय तसेच ओले खोबरे असल्याने या वड्या हवाबंद डब्यात घालून शक्यतो फ्रिजमध्ये ठेवायच्या, ८ ते १० दिवस चांगल्या टिकतात.