हिवाळ्यात मटार, मेथी या भाज्या इतक्या मुबलक मिळतात आणि इतर सिझनपेक्षा तुलनेने स्वस्तही असतात. त्यामुळे या भाज्या हिवाळ्यात वरचेवर खाल्ल्या जातात. तसेच कधी मेथी मटार तर कधी मटार पनीर असे पौष्टिक मेळ घालून चविष्ट भाज्या केल्या जातात. पण मेथी मटार पनीर अशी एकत्र भाजी केली आहे का? हे काॅम्बिनेशन जितकं चविष्ट तितकंच पौष्टिकही असतं. करुन पाहा. विशेषत: मुलांसाठी हे काॅम्बिनेशन खूपच सही आहे. कारण मुलांना नुसती मेथीची भाजी खायला किंवा नुसती मटाराची ऊसळ खायला आवडत नाही. त्यांना ही मेथी मटार पनीर हे काॅम्बिनेशन नक्की आवडेल आणि आरोग्यदृष्ट्या त्यांच्या फायद्याचंही ठरेल.
Image: Google
कशी कराल मेथी मटार पनीरची भाजी?
मेथी मटार पनीरची भाजी करण्यासाठी पाव किलो पनीर, 1 कप मेथी, 1 कप मटार दाणे, 4 कांदे कापलेले, 3 टमाटे कापलेले, 2 हिरव्या मिरच्या कापलेल्या, 1 छोटा चमचा गरम मसाला, पाव चमचा लाल तिखट, बारीक चिरलेली कोथिंबीर , चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार तेल घ्यावं.
Image: Google
मेथी मटार पनीर करताना आधी कढईत थोडं तेल घालून कांदा, मिरची परतून घ्यावी. नंतर कापलेले टमाटे, मेथी आणि मटारचे दाणे घालून ते हलकेसे परतून घ्यावेत. मेथी, टमाटे, मटारचे दाणे मऊ होवू द्यावेत. नंतर यात लाल तिखट आणि मीठ घालावं. तेल सुटेपर्यंत हे परतावं. आपल्याला जितकी पातळ किंवा घट्ट ग्रेव्ही हवी तेवढं पाणी त्यात घालावं. ग्रेव्ही उकळू द्यावी. मग या ग्रेव्हीत पनीरचे तुकडे टाकवेत. पनीर ग्रेव्हीत नीट मिसळून घ्यावं. मग यात गरम मसाला घालावा. भाजी 5 मिनिटं मंद आचेवर ठेवावी. नंतर गॅस बंद करुन वरुन कोथिंबीर भुरभुरुन भाजी झाकून ठेवावी. ही भाजी पोळी, पराठे, नान, भाकरी किंवा नुसत्या भातसोबतही छान लागते.