कधी संध्याकाळी काही खाणे झाले म्हणून किंवा रात्री अचानक बाहेर जेवल्यामुळे घरात पोळ्या उरणे नेहमीचेच. मग शिळी पोळी टाकून देण्यापेक्षा ती चहासोबत खाल्ली जाते किंवा फोडणीची पोळी करणे हा पर्याय असतोच. पण सतत तेच करुन आणि खाऊनही अनेकदा आपल्याला कंटाळा येतो. अशावेळी शिळ्या पोळीचे काही हटके पण पौष्टीक असे पदार्थ केले तर...शिळी पोळी खाणे आरोग्यासाठी चांगले असल्याचे आपण अनेकदा ऐकतो त्यामुळे ती फेकून देण्यापेक्षा त्यापासून वेगळे काहीतरी बनवले तर नक्कीच नाक न मुरडता खाल्ले जाते. थोडे वेगळे पदार्थ केल्यामुळे ते शिळ्या पोळीपासून केले आहेत हेही घरातील लोकांच्या लक्षात येणार नाही आणि वेगळ्या पद्धतीने दिल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेचखूश होतील. यामुळे राहीलेल्या पोळ्या वाया तर जाणार नाहीतच पण एका हेल्दी ब्रेकफास्टची पण सोय होईल. पाहूयात पोळीपासून असे कोणते पदार्थ तयार करता येतील....
१. पोळीचे काप
पोळीचे वेगवेगळ्या आकाराचे काप करुन ते तेलात तळावेत. त्यानंतर त्यावर चाट मसाला किंवा मॅगी मसाला घालावा. पोळी तळल्यामुळे ती एकदम कुरकुरीत होते आणि शंकरपाळ्यासारखी लागते. अशा दोन पोळ्या तळून दिल्या तरी लहान मुले आणि मोठेही आवडीने खातात. पण एरवी नुसती पोळी दिल्यास ती खाण्यासाठी नाक मुरडले जाते. घरात तळलेले असल्यामुळे हे थोडे तेलकट असले तरी त्याचा त्रास होत नाही. चाट मसाल्यामुळे त्याला आंबटसर अशी छान चव येते.
२. फ्रँकी
घरात ज्या भाज्या उपलब्ध असतील अशा कोणत्याही भाज्या बारीक चिरायच्या किंवा किसायच्या. या भाज्या एकत्र करुन मीठ, सॉस, मीरपूड घालून थोड्या वाफवून घ्यायच्या. यामध्ये कांदा, बटाटा, कोबी, ढोबळी, मटार, फ्लॉवर, गाजर, बीट अशा कोणत्याही भाज्यांचा वापर करु शकता. ही वाफवलेली भाजी पोळीच्या मधोमध घालून त्याचा रोल करायचा. बटर किंवा तूपावर हा रोल तव्यावर दोन्ही बाजूने भाजायचा. घरात उपलब्ध असेल तर तुम्ही यामध्ये पनीर, चीज असेही घालू शकता. यामुळे सगळ्या भाज्या तर पोटात जातातच आणि पोळीही वाया जात नाही.
३. समोसा
बटाटा, कांदा या गोष्टी तर आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असतात. मटार किंवा फ्रोजन मटार असतील तर उत्तम. बटाटा शिजवून त्याची भाजी करुन घ्यायची. या भाजीत आपण बडीशेप, धने, जीरे, तिखट, गोडा मसाला, चाट मसाला किंवा घरात उपलब्ध असलेला एखादा मसाल, मीठ घालू शकतो. पोळीमध्ये ही भाजी भरिन त्याला समोसाचा आकार द्यायचा आणि तो तळायचा. हा समोसा खाल्ल्यानंतर राहिलेल्या शिळ्या पोळीचा केला हे घरातील लोकांच्या लक्षातही येणार नाही. यासोबत चिंचेची टचणी किंवा सॉस खाऊ शकता. सकाळी घाईच्या वेळी ब्रेकफास्टसाठी हा उत्तम पर्याय असून विकतच्या मैद्याच्या आणि तेलकट समोश्याला हा उत्तम पर्याय ठरु शकेल.